Illegal businesses flourish in Pandharkawada and Ner Darwha in Yavatmal district : पांढरकवड्याच्या एसडीओंवर झाला होता प्राणघातक हल्ला
Nagpur : यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. यामध्ये रेती, गोमास विक्री, जुगाराचे क्लब, दारूचे गुत्ते, मटका आदी सर्वच धंद्यांचा समावेश आहे. खुलेआम बिनबोभाटपणे सुरू असलेले धंदे कायद्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे, त्यांना दिसत नाही का? की या अवैध व्यावसायिकांना कुणाचा वरदहस्त आहे, असे प्रश्न प्रश्न उपस्थित होत आहेत.
घाटंजी, पांढरकवडा ते महाराष्ट्र – तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल्या पिंपळखुटीपर्यंत हे धंदे पसरलेले आहेत. आजच्या घडीला जरी छापा घातला तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जुगार पाटणबोरी येथे सापडेल, असे सूत्र सांगतात. त्यातही ‘विकेंड’ला कारवाई झाल्यास सामान्यांसह सरकारचेही डोळे विस्फारतील, येवढे मोठे घबाड बाहेर निघेल. कारण यापूर्वी एलसीबीचे तत्कालिन अधिकारी मुकुंद कुळकर्णी यांनी येथे कारवाई केली होती. तेव्हाही मोठी धरपकड झाली होती आणि मोठे घबाड समोर आले होते. आजघडीला त्यापेक्षाही मोठा जुगार येथे सुरू असल्याचे सूत्र सांगतात. असे म्हटले जाते की, येथे दररोज कुणालातरी ‘जॅकपॉट’ लागतो. या परिसरात अवैध दारूचे ३६ गुत्ते सर्रास चालत आहेत. जणू दारू विक्रीची परवानगीच या लोकांना मिळाली आहे, असे येथील चित्र पाहिल्यावर स्पष्टपणे लक्षात येते.
Chandrashekhar Bawankule : मंत्री, नेत्यांसोबत सगळेच फोटो काढतात, पण..
वर्धा जिल्ह्यात पुरवठा..
पांढरकवडा टोल नाक्याच्या आधी एक बार आहे. सद्यस्थितीत हा बार बंद आहे. पण कागदोपत्री सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे. या ठिकाणाहून वर्धा जिल्ह्यात बोगस दारू सप्लाय होते. या बंद बारमध्येच या दारूची पॅकींग केली जाते. नंतर तेथून वर्धेकडे रवाना केली जाते. घाटंजी तालुक्यातही २० अवैध दारू विक्रेत्यांना परवानगी दिली असल्याचे समजते. गोमांस विक्रीचाही धंदा येथे चांगलाच फोफावला आहे. या धंद्यांमध्ये कुणाची ‘ठाकूरकी’ चालते हे सर्वांनाच माहिती आहे. पण कारवाई करायला कुणाच धजावत नाही की त्यांनी ‘अर्थपूर्ण’ चुप्पी साधली आहे, हे कळायला मार्ग नाही.
रेतीचा व्यापार, अन् ‘भाऊ’ आमचे सरदार..
रेतीच्या अवैध व्यवसायातून मागील काळात पांढरकवड्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात कलम ३५३ सारखा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असे कायद्याचे जाणकार सांगतात. पण यामध्ये थातूरमातूर गुन्हे दाखल करून प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात आले आहे. आता या प्रकरणात कोण कोणाला वाचवत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. रेती घाटाच्या विषयात असे गंभीर गुन्हे दाखल झाल्यास मोक्काचीही कारवाई होऊ शकते. पण अद्याप तसे बघायला मिळाले नाही. यामध्ये कुणाचे प्रेशर कुणावर आहे, हे सुद्धा कळत नाहीये. ‘रेतीचा व्यापार.. अन् भाऊ आमचे सरदार…’, असे हे रेती तस्कर छाती ठोकून सांगतात. त्यामुळे आता हे ‘भाऊ’ कोण, हे शोधण्याची गरज आहे.
सामान्य लोकांनाही कळते..
राज्यात हिंदुत्ववादी सरकार विराजमान झाल्यानंतर गोमांस विक्री बंद होईल, अशी जनसामान्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात उलटेच घडत आहे. या सरकारच्या काळात जनावरांची तस्करी, गोमांस विक्री जोमाने सुरू असल्याचेही येथील सूत्र सांगतात. या धंद्यामध्ये कोण कोणाचे मित्र आहेत, हे सामान्य जनतेला कळून चुकले आहे. पण संबंधित यंत्रणेला कळू नये, याचे आश्चर्य वाटते.
Devendra Fadnavis : काही लोक एकही अक्षर न वाचता, जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आहेत!
नेर-दारव्ह्यात आश्रय कुणाचा?
नेर आणि दारव्हा तालुक्यांमध्येही स्थिती काही वेगळी नाही. येथे अवैध धंद्यांची ‘पवनचक्की’ जोरात सुरू असल्याची माहिती आहे. दारू, जुगार, मटका, गोमांस विक्रीचे धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आश्रय दिल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये गौहत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या आणि तेथून उचलबांगडी झालेल्या एका वादग्रस्त ठाणेदाराला जिल्ह्यातील एका मोठ्या जबाबदार पदाधिकाऱ्याने कंट्रोल रूममधून आपल्या मतदारसंघात आणले.
एक ही थाली के चट्टे बट्टे..
या ठाणेदाराला ‘मॉडेलिंग’चीही आवड असल्याचे सांगण्यात येते. यामध्येही महिलेशी संबंधित एका प्रकरणात हा पोलिस अधिकारी वादग्रस्त ठरला होता. गोहत्या प्रकरणात वादग्रस्त असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला आपल्या मतदारसंघात संबंधित पदाधिकाऱ्यांनी कशासाठी आणले असावे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. थोडक्यात काय तर आणणाराही शौकीन आणि ज्याला आणले तोही शौकीन. ‘एक ही थाली के चट्टे बट्टे’ सोबत आल्याची चर्चा जिल्ह्यात जोरावर सुरू आहे.