व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र india Us Trade Deal : ३० ट्रिलियन डॉलरचा अमेरिकी बाजार भारतासाठी खुला!

india Us Trade Deal : ३० ट्रिलियन डॉलरचा अमेरिकी बाजार भारतासाठी खुला!

india-us-trade-deal-30-trillion-market-18-percent-tariff-framework : आजपासून १८ टक्के टॅरिफ भारत-अमेरिका व्यापार करारातील महत्त्वाचे मुद्दे

New Delhi : भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले असून दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार कराराचा मसुदा जाहीर केला आहे. या फ्रेमवर्कनुसार आजपासून भारतावर १८ टक्के टॅरिफ लागू करण्यात आला असून याआधी प्रस्तावित असलेला ५० टक्के टॅरिफ रद्द करण्यात आला आहे. तसेच रशियाकडून तेल खरेदीवर लावण्यात आलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफही मागे घेण्यात आला आहे.

या करारामुळे भारतासाठी अमेरिका सुमारे ३० ट्रिलियन डॉलरचा प्रचंड बाजार खुला करणार आहे. पुढील आठवड्यात दोन्ही देशांमध्ये अंतिम व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता असून त्याआधी हा अंतरिम फ्रेमवर्क तातडीने अंमलात आणला जाऊ शकतो. १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार चर्चांना या फ्रेमवर्कमुळे वेग मिळणार आहे.

Rohit Pawar : विमान अपघात, कुटुंबीयांची एकजूट, विलीनीकरणावर स्पष्ट भूमिका

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, या कराराच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने बाजारपेठेतील प्रवेश वाढवला जाईल, पुरवठा साखळी अधिक मजबूत केली जाईल आणि व्यापारातील अडथळे दूर केले जातील. औद्योगिक उत्पादनांवरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. हा करार भारतासाठी ऐतिहासिक ठरणार असून त्यामुळे ३० ट्रिलियन डॉलरचा अमेरिकी बाजार भारतीय उद्योगांसाठी खुला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅरिफ कपातीमुळे भारतातील वस्त्रोद्योग, चामडे व पादत्राणे, प्लास्टिक व रबर उत्पादने, जैविक रसायने, गृहसजावट, हस्तकला तसेच निवडक यंत्रसामग्री क्षेत्राला मोठ्या संधी मिळणार आहेत. याचबरोबर भारताने पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून सुमारे ५०० अब्ज डॉलरची उत्पादने खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. यामध्ये कच्चे तेल, ऊर्जा साधने, विमाने, लढाऊ विमाने तसेच काही कृषी आणि अन्नपदार्थांचा समावेश असेल.

या कराराअंतर्गत भारत अमेरिकेच्या बहुतांश औद्योगिक आणि कृषी उत्पादनांवरील टॅरिफ कमी किंवा रद्द करणार आहे. यामध्ये कोरडी धान्ये, पशुखाद्यासाठी वापरला जाणारा लाल ज्वार, कडधान्ये, फळे, सोयाबीन तेल, मद्य आणि स्पिरिट्स यांचा समावेश आहे. दुसरीकडे अमेरिका भारतातील जेनेरिक औषधे, रत्न व हिरे तसेच विमानांच्या सुट्या भागांवरील टॅरिफ पूर्णपणे रद्द करणार आहे.

या व्यापार कराराचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना, शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना होईल, असा दावा करण्यात येत आहे. यामुळे महिला आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मात्र भारताने मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, कुक्कुटपालन, मांस, दूध व दुग्धजन्य पदार्थ, इथेनॉल, तंबाखू आणि काही भाजीपाला यांसारख्या महत्त्वाच्या उत्पादनांवर कोणतीही टॅरिफ सवलत दिलेली नाही.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून साकारलेले ३.९३ कोटींचे राणी हिराई उमेद मार्ट लोकार्पित

पुढील पाच वर्षांत भारत अमेरिका कडून ऊर्जा, विमाने, मौल्यवान धातू, तंत्रज्ञान उत्पादने आणि कोकिंग कोळसा मोठ्या प्रमाणात खरेदी करणार असून जीपीयू आणि डेटा सेंटरशी संबंधित उत्पादनांच्या व्यापारालाही चालना मिळणार आहे. या करारामुळे भारत-अमेरिका आर्थिक संबंध नव्या टप्प्यात प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!