Jitendra Awhad : मतांची चोरी हा राजकीय घोटाळा, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Vote theft is a political scam : राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाचे उत्तर नाही

Akola देशातील मतांची चोरी हा एक मोठा राजकीय घोटाळा असून, या संदर्भात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते रविवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंडल यात्रेचे अकोल्यात आगमन झाले होते.

आव्हाड म्हणाले, “गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ७६ लाख मते वाढली आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांची चोरी होत असून, ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे. या घोटाळ्यातून लोकशाही व्यवस्थेचे नुकसान होत आहे.” त्यांनी पुढे सांगितले, “गेल्या विधानसभा निवडणुकीनंतरच महाराष्ट्रातील निवडणूक ‘मॅनेज’ झाल्याचा संशय मी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी ट्विटरवर व्यक्त केला होता. आज हे स्पष्ट झाले आहे की मतांची चोरी करून हे सरकार आले आहे.”

Pawar Vs Padalkar : ‘रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा’, पडळकरांचा पलटवार

या पत्रकार परिषदेस माजी मंत्री गुलाबराव गावंडे, ओबीसी आघाडीचे प्रदेश प्रमुख राज राजापूरकर, आमदार साजिदखान पठाण, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आशा मिरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

आव्हाड यांनी आणखी एक गंभीर आरोप करताना म्हटले की, “पक्षांतरबंदीचा कायदा असताना देखील सध्याचा निवडणूक आयोग पक्षांतराला प्रोत्साहन देत आहे.”

आव्हाड म्हणाले, “बहुजन समाजातील घटकांना जागे करण्यासाठी मंडल यात्रा काढण्यात आली आहे. ज्यांनी मंडल आयोग, ओबीसी आरक्षण आणि संविधानाला विरोध केला, त्यांनाच आता ओबीसींची कणव आली आहे.”

CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती !

“आम्ही हिंदू आहोत; पण सनातनी नाही,” असे स्पष्ट करत आव्हाड म्हणाले, “समाजव्यवस्था बदलली पाहिजे म्हणून जे बदलाच्या बाजूने उभे राहिले आणि कर्मकांडाच्या विरोधात होते, त्यांना छळण्यात आले. जात आणि धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. सरकार ठरवणार का की कोण काय खाणार? ज्यांना जे खायचे आहे ते खाऊ द्यावे.”