MLA Kishor Joregewar’s stance in doubt on the Municipal Corporation’s legal action in Chandrapur : चंद्रपुरात मनपाच्या कायदेशीर कारवाईवरून आमदार जोरगेवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Chandrapur चंद्रपूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार प्रस्तावित २४ मीटर रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी संरक्षक भिंत महापालिकेने कायदेशीर अधिकारांचा वापर करून हटवली असली, तरी या कारवाईवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
हटवण्यात आलेली ही भिंत स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या पत्नी कल्याणी जोरगेवार, मुलगा प्रसाद जोरगेवार तसेच पवन व तपस्या सराफ यांच्या मालकीच्या जागेलगत होती. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेने केलेल्या या कारवाईचे स्वागत करण्याऐवजी, स्वतःच्या कुटुंबीयांची मालमत्ता बाधित झाल्याने आमदारांनी थेट प्रशासनाविरोधातच आक्रमक पवित्रा घेतला आहे. पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आणि १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत आमदार कुटुंबीयांनी महापालिका आयुक्त अकनुरी नरेश आणि अतिक्रमण विभागप्रमुख राहुल पंचबुद्धे यांच्याविरोधात थेट पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Operation Tiger : नवरात्रीपूर्वी ठाकरेंचे १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?
दुसरीकडे, महापालिका प्रशासनाने ठाणेदारांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक किंवा प्रस्तावित रस्त्याच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी पूर्वसूचना देण्याची कसलीही अट कायद्यात नाही. त्यामुळे ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर आणि शहराच्या विकासासाठीच करण्यात आली असून यात कोणतीही मनमानी झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे आता चंद्रपुरात एक नवा वाद निर्माण झाला आहे. रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीमुक्तीसाठी महापालिकेने उचललेल्या कायदेशीर पावलाला लोकप्रतिनिधी म्हणून पाठिंबा देणे अपेक्षित असताना, केवळ स्वतःच्या कुटुंबाच्या हितसंबंधांमुळे प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याचा आरोप होत आहे. सामान्य नागरिकाच्या अतिक्रमणावर कारवाई झाली की ते विकासाचे काम आणि स्वतःच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर हातोडा पडला की ती मनमानी, असा दुहेरी निकष तर लावला जात नाही ना? असा जळजळीत सवाल आता नागरिक विचारत आहेत. या वादामुळे कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान राहणार की लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक मालमत्तेनुसार तिचे निकष बदलणार, या मुद्द्यावरून आमदार विरुद्ध महापालिका संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.








