The atmosphere heated up in backdrop of the Maratha movement : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात संघर्षाचं चित्र निर्माण झालं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईच्या आझाद मैदानावर धडक देण्याची तयारी केली आहे. ओबीसीमधून आरक्षण मिळावं, ही मराठा समाजाची प्रमुख मागणी असून यासाठी हजारो बांधव मुंबईकडे कूच करत आहेत.
पण या आंदोलनाला आता ओबीसी नेते आक्रमकपणे विरोध करताना दिसत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून थेट इशारा दिला आहे. “मनोज जरांगेंची मागणी ही बेकायदा आहे. शासनाने त्यांना योग्य तथ्ये समजावून सांगितली नाहीत तर महाराष्ट्रात अराजक माजेल,” असा इशारा हाकेंनी दिला.
Anil Deshmukh : अमेरिकेच्या टेरीफचा कापुस उत्पादकांना फटका !
हाके म्हणाले की, “जरांगे यांच्या मागणीचा अर्थ मराठा टिकवायचा आणि ओबीसी संपवायचा, असाच होतो. जर ओबीसी समाजाने प्रति-आंदोलन पुकारलं तर त्यांची संख्या जरांगे यांच्या समर्थकांच्या दहापट रस्त्यावर उतरेल.”
यावेळी हाकेंनी जरांगेंच्या राजकीय संबंधांवरही निशाणा साधला. “जरांगे कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभं करतील याचा नेम नाही. अजित पवारांच्या आमदारांकडून त्यांना रसद मिळाली. ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतानाही सत्ताधाऱ्यांकडून त्यांना मदत मिळते. ओबीसी मंत्री आता एकत्र आले पाहिजेत आणि मुख्यमंत्री यांना स्पष्ट सांगितलं पाहिजे,” अशी मागणीही हाकेंनी केली.
या विधानानंतर मराठा आणि ओबीसी संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण तापणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.
—