Intense lobbying by aspirants for nomination to the Legislative Council : सत्ताधाऱ्यांच्या एका जागेसाठी बुलढाण्यातून जोरदार दावेदारी; शिंदे-रायमुलकर-खेडेकर चर्चेत
Buldhana विधान परिषदेतील रिक्त जागेसाठी सत्ताधारी महायुतीत हालचालींना वेग आला असून, बुलढाणा जिल्ह्यातून दावेदारीसाठी इच्छुकांमध्ये आतापासूनच चुरस वाढली आहे. तिकीट मिळवण्यासाठी काही इच्छुकांनी थेट मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अंतिम निर्णय अजूनही धूसर असला, तरी जिल्ह्यातील समीकरणे वेगाने बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपकडून जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, शिंदेसेनेकडून माजी आमदार संजय रायमुलकर, तर मेहकर-सिंदखेडराजा पट्ट्यातून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची नावे प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहेत. तिन्ही नेत्यांनी आपल्या-आपल्या पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात असले, तरी सध्याच्या महायुतीतील राजकीय समीकरणांमुळे कोणाचे पारडे जड ठरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
राजकीय जाणकारांच्या मते, सत्ताधाऱ्यांच्या कोट्यातून केवळ एकाच उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता असल्याने स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. या एका जागेत बुलढाण्याचा विचार होईलच, याबाबत अनिश्चितता असल्याने इच्छुकांची धडपड वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील लॉबिंग, गटबाजी आणि स्थानिक पाठबळ यांना निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, शिंदेसेनेतील अंतर्गत मतभेद आणि स्थानिक स्तरावरील नाराजीची चर्चा देखील या शर्यतीत महत्त्वाची ठरत आहे. पालिका निवडणुकीतील पराभवानंतर विजयराज शिंदे काहीसे बचावात्मक भूमिकेत असल्याचे बोलले जात असताना, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय रायमुलकर यांच्या राजकीय पुनरागमनासाठी ही संधी महत्त्वाची मानली जात आहे.
Anganwadi workers : तीन महिन्यांपासून केंद्राचा निधी थकीत; दीड लाख सेविका-मदतनीसांमध्ये संताप
मेहकरमध्ये उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष तीव्र होत असतानाच, सिंदखेडराजा मतदारसंघात मेहकरचा वाढता हस्तक्षेप माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक असंतोष आणि गटबाजीचा अंतिम तिकीट वाटपावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच, विधान परिषद तिकिटासाठी बुलढाण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुंबईतील लॉबिंग विरुद्ध स्थानिक ताकद अशीच या लढतीची दिशा राहणार असल्याचे चित्र आहे.








