Congress to form special committee to inspect observer’s role in legislative election: निवडणूक जाहीर झाल्यापासून काही उमेदवारांनी मतदानापूर्वीच रिंगणातून पळ काढल्याचा आरोप
Nagpur विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वच्या सर्व मतदारसंघांत दारुण पराभव झाला आहे. १७ पैकी एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता न आल्याने आणि निवडणूक जाहीर झाल्यापासून काही उमेदवारांनी मतदानापूर्वीच रिंगणातून पळ काढल्यामुळे आता काँग्रेस अंतर्गत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, पराभवाचा सखोल शोध घेण्यासाठी आणि वादग्रस्त उमेदवारी देणाऱ्या निरीक्षकांची चौकशी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक उच्चस्तरीय ‘समीक्षा समिती’ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रत्येक मतदारसंघासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली होती. उमेदवारांची क्षमता, पक्षाची ताकद आणि स्थानिक गणितं पाहून हे उमेदवार निश्चित करणे निरीक्षकांचे काम होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनी घेतलेली माघार आणि झालेला दारुण पराभव यांमुळे निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Mp vikas nidhi : विकास निधी मिळत नसल्याचा दावा फोल? कोट्यवधींचा निधी पडूनच
उमेदवार नेमके कोणी आणि कोणत्या निकषांवर निश्चित केले, निरीक्षकांनी अहवाल तयार करताना नेमके काय पाहिले, आणि उमेदवारांची पार्श्वभूमी तपासण्यात निरीक्षकांकडून गफलत झाली का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निरीक्षकांची चौकशी करण्यासाठी ही वरिष्ठ नेत्यांची समिती काम करणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या पराभवाची कबुली दिली असली, तरी ही निवडणूक एका वैचारिक भूमिकेतून लढली गेल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ नसले तरी लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी आमची ही लढाई सुरू असल्याचे स्पष्ट करत नागपूरमध्ये संख्याबळ नसतानाही अतुल लोंढे यांनी निवडणूक लढविली, असे सपकाळ म्हणाले. परंतु, एकूणच निकालांची आणि निरीक्षकांच्या भूमिकेची चौकशी वरिष्ठ नेत्यांची समिती लवकरच करेल, असे त्यांनी जाहीर केले.
एकीकडे काँग्रेस आपल्या अंतर्गत चुका शोधण्यासाठी समिती स्थापन करत असताना, दुसरीकडे सत्ताधारी भाजप महायुतीने सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून उमेदवार पळवणे, अर्ज बाद करणे आणि विरोधी उमेदवारांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. ‘ज्यांच्या हाती काठी, त्याची म्हैस’ आणि ‘बळी तो कान पिळी’ याप्रमाणे भाजपने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वारेमाप वापर करून प्रत्येक मतदाराला ५-५ लाख रुपयांचे आमिष दाखवले, असे सपकाळ यांनी नमूद केले. या बाह्य कारणांसोबतच, पक्षांतर्गत झालेल्या चुकांचा अहवाल ही समीक्षा समिती पक्षश्रेष्ठींकडे सादर करणार आहे. उमेदवार निवडीत झालेल्या मोठ्या घोडचुकांमुळेच पक्षाला या नामुष्कीला सामोरे जावे लागल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असून, या चौकशी समितीच्या अहवालानंतर काँग्रेसमध्ये काही मोठ्या नेत्यांवर आणि निरीक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.








