Raj Thackerays angry letter to Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेंचे संतप्त पत्र
Mumbai : महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचे आणि बेपत्ता होण्याचे प्रकार धोकादायक पातळीवर वाढले असताना राज्य सरकार मात्र गंभीरपणे दखल घेत नसल्याचा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या तीव्र शब्दांतल्या पत्रातून राज ठाकरे यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर, विधिमंडळाच्या उदासीनतेवर आणि प्रशासनाच्या अपयशावर जोरदार बोट ठेवलं आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या काळात महाराष्ट्रात लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली असताना सरकार केवळ आकडेवारी सांगून मोकळं होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. किती केसेस दाखल झाल्या आणि त्यातली किती मुलं सापडली, एवढ्यावर समाधान मानणं म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करण्यासारखं असल्याचं राज ठाकरे यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. अनेक पालक पोलिसांकडे तक्रारच नोंदवत नाहीत, अशा हजारो घटना आकडेवारीत येतच नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटींच्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी
मुलांना पळवून आंतरराज्य टोळ्यांमार्फत भीक मागायला लावणं, बालकामगार म्हणून विकणं हे सगळं उघडपणे सुरू असताना या टोळ्या इतक्या निर्भयपणे काम कशा करतात, याचं उत्तर सरकारकडे आहे का, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्थानकांवर भीक मागणारी लहान मुलं नेमकी कोणाची आहेत, त्यांच्यासोबत असलेली माणसं त्यांची खरी आई-वडील आहेत का, याचा तपास करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गरज पडल्यास डीएनए चाचण्या करण्याचे आदेश द्यावेत, इतकं धाडस सरकार दाखवणार आहे का, असा सवालही या पत्रात आहे.
Winter session : उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित
लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली गायब होत आहेत, जमिनी बळकावल्या जात आहेत, आणि तरीही या गंभीर विषयांवर विधिमंडळात सविस्तर चर्चा होत नाही, यावर राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशन म्हणजे फक्त पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याचं साधन बनलं आहे का, मंत्री सभागृहात नसल्यामुळे महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होतच नाही, अशी कठोर टीकाही त्यांनी केली आहे.
Sudhir Mungantiwar : जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत मुनगंटीवार आक्रमक
केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष हल्ला चढवत, वंदे मातरमवर आक्रमक चर्चा करणाऱ्या केंद्राला मातांचा आक्रोश ऐकू येत नाही का, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. हा प्रश्न केवळ एका राज्याचा नसून देशपातळीवर सर्व राज्यांशी चर्चा करून विशेष कृतिगट तयार करण्याची गरज असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी केवळ अधिवेशनात चर्चा घडवून आणून थांबू नये, तर ठोस आणि कठोर कारवाई करावी, हीच महाराष्ट्राची अपेक्षा असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. या पत्रामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था, बालसुरक्षा आणि सरकारची संवेदनशीलता यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
___








