opposition camps outside the strongroom : सीसी कॅमेऱ्यांची हार्डडिस्क बदलण्यावरून हलचल; ‘अलर्ट मोड’मध्ये विरोधक, सत्ताधरी मात्र निर्धास्त
बुलढाणा : नगरपरिषद निवडणुकांचे राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, स्ट्राँगरूममधील सीसी कॅमेऱ्यांची हार्डडिस्क स्टोरेज फुल होणार असल्याने त्या बदलण्याची प्रक्रिया आता पूर्ण पारदर्शकतेत उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आयोगाच्या निर्देशांनुसार वाढीव सुरक्षा म्हणून आणखी ८ सीसी कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील नेते-कार्यकर्ते अक्षरशः ‘अलर्ट मोड’वर गेले असून, मतमोजणी होईपर्यंत कोणीही विश्रांतीच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसत आहे.
उच्च न्यायालयाने निकाल पुढे ढकलल्यामुळे आता मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत ईव्हीएमच्या सुरक्षिततेवरून जिल्ह्यातील सर्वच पक्ष अधिक सतर्क झाले आहेत. सध्या विविध पक्षांचे प्रमुख उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक तीन शिफ्टमध्ये चौकशी मोडवर स्ट्राँगरूमबाहेर पहारा देताना दिसत आहेत.
Winter Session : बोगस जातवैधता प्रकरणात मोठी कारवाई, अधिवेशन इम्पॅक्ट
या नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबरला असल्याने निकाल लांबणीवर पडल्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली आहे. बुलडाण्यातील स्ट्राँगरूमबाहेर तब्बल २५ उमेदवारांचे प्रतिनिधी नियमितपणे थांबून सीसीटीव्ही फुटेज, आतली हालचाल आणि सुरक्षा तपासत आहेत.
सुरक्षा व्यवस्था ‘फुल प्रूफ’
२६ SRPF जवान
२० कर्मचारी
२ पोलिस अधिकारी
अस्तित्वात ११ सीसी कॅमेरे + आता अतिरिक्त ८ बसणार
परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल होऊ नये म्हणून यंत्रणा सतत नजर ठेवून आहे.
अॅड. सतीश रोठे यांनी स्ट्राँगरूमसमोरील ५ कॅमेरे बंद असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी तो थेट फेटाळून लावत सांगितले की— “ज्या ठिकाणी कॅमेरे बंद असल्याचा आरोप झाला, त्या ठिकाणी कॅमेरे बसवलेलेच नव्हते.”
उमेदवारांना स्ट्राँगरूम पाहणीसाठी येण्याची मुभा असली तरी फक्त १० मिनिटे थांबण्याची मर्यादा आणि नोंदणी रजिस्टरवर सही बंधनकारक आहे. उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प.), अपक्ष आदी उमेदवारांचे प्रतिनिधी रोजच्या भेटी देत आहेत.
भाजप–शिंदेसेना युती मात्र स्ट्राँगरूमजवळ इतका गोंधळ करण्याच्या बाजूने नाही. त्यांचे स्पष्ट मत— “निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. स्वतंत्रदृष्ट्या पहारा देण्याची गरज नाही.” दुसरीकडे विरोधक मात्र रोज पहारा देत असल्याने परिसर राजकीयदृष्ट्या तापलेला आहे.
Amravati Commissioner : रेतीमाफियांचा पर्दाफाश; प्रशासनावर नामुष्की
६ डिसेंबरच्या आयोगाच्या पत्रानुसार सीसी कॅमेऱ्यांची हार्डडिस्क स्टोरेज फुल होत असल्याने ती उमेदवारांच्या उपस्थितीत बदलली जाणार आहे. त्या प्रक्रियेची नोंद ठेवण्यासाठी अतिरिक्त ८ सीसी कॅमेरे बसवले जात आहेत, असे निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी स्पष्ट केले.








