Minimum Spending Capacity of ₹1 Crore Required for Candidacy : राजकीय पक्षांकडून तगड्या उमेदवारांचा शोध सुरू; निष्ठावान कार्यकर्ते मात्र वेटिंगवर!
Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असताना, एका प्रमुख राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिलेल्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
“जिल्हा परिषद निवडणूक लढवायची असेल, तर उमेदवाराकडे किमान १ कोटी रुपयांचा खर्च करण्याची क्षमता हवी!”
या थेट संदेशानंतर पक्षनिष्ठ पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “सतत पक्षासाठी झटणाऱ्या, सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय?” असा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहिण’च्या ई-केवायसीत सर्व्हरचा खोडा!
उमेदवारीसाठी चुरस — नेत्यांची डोकेदुखी वाढली
प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या गटांमध्ये मोर्चे, सभा, धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेऊन जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी दोन-दोन इच्छुक एकाच गटात सक्रिय झाल्याने स्थानिक नेत्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सौभाग्यवती मैदानात!
या निवडणुकीत काही सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्नींना उमेदवार म्हणून उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये महिलांच्या माध्यमातून आपली राजकीय पकड निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही केला जात आहे. मात्र, त्यामुळे संबंधित कर्मचारी आपल्या मूळ शासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.
इच्छुकांचे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्रीसारखे सण इच्छुकांसाठी प्रचाराची पर्वणी ठरत आहेत. गावागावात आरती, फटाके, मंडळांना देणग्या, सोशल मीडियावर व्हिडिओ मोहिमा अशा स्वरूपात ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा ट्रेंड दिसून येत आहे. काहींनी तर गटात फिरण्यासाठी भाडेतत्त्वावर गाड्या आणि व्हिडिओग्राफरची सोय केली आहे.
निवडणूक आयोग उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरचा खर्च लक्षात घेत असला, तरी गेल्या तीन ते चार महिन्यांपासूनच इच्छुकांनी ‘अदृश्य प्रचार’ सुरू केल्याची चर्चा आहे.
पक्षनिष्ठा की पैसा?
दरम्यान, राजकीय पक्षांच्या जिल्हा स्तरावरील नेत्यांनीही उमेदवार निवडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे —
“स्थानिक स्वराज्य निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. उमेदवारी मेरिटवर आणि कार्यकर्त्यांच्या कामावर दिली जाते.”
— विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष, भाजप
“उमेदवार जनतेचा माणूस हवा, केवळ धनाढ्य असलेला नव्हे. पैशाने मतं विकत घेता येत नाहीत; लोकांशी समरसता असणे गरजेचे आहे.”
— अॅड. नाझेर काझी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)








