16 Lakh Voters to Elect 183 Members : १६ लाख मतदार निवडणार १८३ सदस्य; महायुती–मविआत रणनीतीच्या बैठका सुरू
Buldhana महाराष्ट्राच्या स्थापनेपासून प्रामुख्याने काँग्रेसच्या प्रभावाखाली राहिलेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर तालुका, गट आणि गण पातळीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसह पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी — अशा एकूण १८३ सदस्यांची निवड होणार आहे. सुमारे १६ लाख ग्रामीण मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून, १,९८८ मतदान केंद्रांची प्राथमिक आखणी प्रशासनाने केली आहे. काही ठिकाणी केंद्रसंख्येत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय यंत्रणेतही आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या पालक सचिव शैला ए. यांनी बुलढाण्यात भेट देऊन निवडणुकीच्या प्राथमिक तयारीचा अनौपचारिक आढावा घेतला. याच पार्श्वभूमीवर आगामी नगरपरिषद निवडणुकींचाही बिगूल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१६-१७ च्या अपवाद वगळता बुलढाणा जिल्हा परिषद काँग्रेसच्या वर्चस्वाखाली राहिली आहे. मात्र २०१७ मध्ये भाजपने २४ सदस्य निवडून आणत ऐतिहासिक घुसखोरी केली होती. त्यानंतर राज्यातील सत्तांतरानंतर भाजपची पकड काहीशी सैल झाली. यंदाची निवडणूक भाजपसाठी घाटावर आणि घाटाखालील मतदारसंघांतील जनाधाराची खरी कसोटी ठरणार आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटप, नेतृत्व आणि प्रचार याबाबत अंतर्गत बैठकांना वेग आला आहे. दोन्ही आघाड्यांत रणनीती आखणी सुरू असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने रंग घेऊ लागली आहेत.
“झिरो रोस्टर” संदर्भातील काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. या याचिका स्वीकारल्या जातात की नाही, आणि न्यायालय त्यावर कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








