Congress legislature leader Vijay Wadettiwar’s scathing attack on BJP and Chief Minister Devendra Fadnavis : महायुती सरकारची वॉशिंग मशीन MAX स्पीडवर, ड्रग प्रकरणातील आरोपीचा भाजपकडून उमेदवार म्हणून विचार
Nagpur : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ माजली आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, ड्रग प्रकरणातील आरोपीला भाजप उमेदवारी देणार असल्याच्या वृत्तावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. महायुती सरकारची वॉशिंग मशीन म्हणजे कमालच आहे. आधी भ्रष्टांना एकदम पवित्र बनवायची आणि आता तर ड्रग प्रकरणात तीन महिने तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला थेट उमेदवारी देण्याची तयारी चालवली आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढवला आहे.
यासंदर्भात X वर प्रतिक्रिया देत वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, हे राज्य चालतंय की प्रॉक्सी कंपनी? पोलिसांनी विनोद गंगणे याला पकडला, आता पोलिसांचंच डोकं चक्रावलं असेल. आम्ही गुन्हेगार पकडायचे की सरकारसाठी उमेदवार शोधायचे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. आजची परिस्थिती अशी झाली आहे की, ड्रग, चोरी, दरोडा, असा कोणताही गुन्हा केला तरी भाजपकडून क्लीनचिट मिळण्याची शक्यता जास्त बळावली आहे.
Pune land scam : मुंढवा जमीन घोटाळ्यावरून अंजली दमानियांचा गंभीर आरोप
यापुढे पोलिस कोणत्याही गुन्हेगारावर कारवाई करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील. कारण कारवाई केली की तोच व्यक्ती उद्या भाजपकडून तिकीट घेऊन नेता बनलेला दिसेल. भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवत वडेट्टीवारांनी उपरोधाने अधिकच कठोर विधान केले. ते म्हणाले, कदाचित लवकरच गृहविभाग ‘गुन्हेगार शोधा अभियान’ राबवून भाजपला उमेदवार पुरवण्याचे राष्ट्रकार्यही सुरू करेल, असा संशय येणेही आता स्वाभाविक झाले आहे.
वडेट्टीवारांच्या या तिखट टीकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ड्रग प्रकरणातील आरोपीच्या उमेदवारीच्या चर्चेने भाजपची नैतिकता, सरकारच्या निर्णयक्षमतेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकूणच, वडेट्टीवारांच्या अचूक निशाण्यावर पुन्हा एकदा महायुती सरकार आले आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण तापणार, हे निश्चित.








