land scam parth pawar ajit pawar allegations anjali damania : पार्थ पवार प्रकरणामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ!
Pune : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप होत असून विरोधकांकडून थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. या प्रकरणाला नवे वळण देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गेटवरच रोखण्यात आले, त्यामुळे त्यांनी अधिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून अजित पवारांवर थेट निशाणा साधला आहे.
पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले असताना अंजली दमानिया पुण्यातील मुंढवा भागात ती जमीन पाहण्यासाठी पोहोचल्या. मात्र, प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय आत सोडणे अशक्य असल्याचे सांगत त्यांना थांबवले. दमानिया यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संबंधित डायरेक्टरचा संपर्क क्रमांक घेतला आणि फोनवर परवानगी मागितली. परंतु, त्या व्यक्तीने अत्यंत उद्धटपणे बोलल्याचा आरोप दमानिया यांनी केला. अत्यंत नम्रतेने विनंती करूनही दोन जणांना पाहणीची परवानगी मिळू शकली नाही, असे त्यांनी नमूद केले. निर्णय कुणी वरून घेतला, कोणाचे फोन आले, परवानगी नाकारण्यामागे कोणाचा दबाव होता याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही, पण पाहणी रोखण्याचा निर्णय हेतुपुरस्सर वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दमानिया म्हणाल्या की, सरकारने ही जमीन संशोधनासाठी संबंधित बोर्डाला दिली आहे. काही दिवसांपूर्वीच काहीजण येथे येऊन गोंधळ घालून गेले होते. ते नेमके कोण होते, काय परिस्थिती आहे हे समजून घेण्यासाठी त्या पाहणी करू इच्छित होत्या. मात्र, केंद्र सरकारचा एक अधिकारी त्यांच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने संवाद साधत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही समितीने हा व्यवहार नियमांनुसार झाला असे म्हणणे शक्य नाही, असेही त्यांनी जोर दिला.
Amit Thackeray : अमित ठाकरेंनी अचानक अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला
यानंतर दमानिया यांनी थेट अजित पवारांचे नाव घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार हा व्यवहार रद्द करण्याचे अधिकारी कोण, असा सवाल त्यांनी केला. अजित पवार, देवेंद्र फडणवीस किंवा अगदी नरेंद्र मोदीदेखील हा व्यवहार रद्द करू शकत नाहीत, कारण या प्रकरणात फसवणूक झाल्याचा दावा दमानिया यांनी केला. जर हा व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न झाला तर त्या स्वतः कोर्टात आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी त्यांनी पुन्हा एकदा ठाम मागणी केली.
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दमानिया यांच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून पार्थ पवारांवरील आरोपांचा परिणाम थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
_____








