growing influence of AIMIM in the state is becoming a concern for Congress : नगरपालिका निवडणुकांत संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही लक्षणीय वाढ
Akola असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत राज्यभरात एका नगराध्यक्षपदासह ८३ जागांवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. यामध्ये ६७ हून अधिक जागांवर ‘एमआयएम’चे उमेदवार थेट पक्षाच्या चिन्हावर विजयी झाले असून, काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातूनही उमेदवार निवडून आले आहेत.
यापूर्वीच्या निवडणुकांत ३० ते ४० जागांपुरते मर्यादित असलेले ‘एमआयएम’चे अस्तित्व या निवडणुकीत विशेषतः विदर्भात लक्षणीयरीत्या वाढले आहे. वाढलेल्या संख्याबळासोबतच पक्षाची आतापर्यंत एक अंकी असलेली मतांची टक्केवारी आता दुहेरी आकड्यात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. ही वाढ काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला धक्का देणारी ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Local Body Elections : सिंदखेडराजा नगर परिषदेत ‘मेहेत्रे पॅटर्न’चा दबदबा!
विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ‘एमआयएम’चा प्रभाव वाढताना दिसत आहे. मुंबईतील काही भागांतही पक्षाचे अस्तित्व अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
अल्पसंख्याक समाजाची मते अनेक दशकांपासून काँग्रेसची पारंपरिक मतपेढी मानली जात होती. दलित व वंचित घटकांचाही मोठा वर्ग दीर्घकाळ काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या घटकांमध्ये काँग्रेसबाबत नाराजी वाढत असून, पर्यायाच्या शोधात मतदार ‘एमआयएम’कडे वळत असल्याचे चित्र नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होत आहे. काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते खासगी चर्चांमध्ये या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत असल्याचे समजते.
Local Body Elections : बहुमताअभावी नगराध्यक्ष अडचणीत, उपाध्यक्षपदांसाठी जोरदार ‘वाटाघाटी’
सन २०१६ मधील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत ‘एमआयएम’चे ३० ते ४० नगरसेवक निवडून आल्याचा पक्षाचा दावा होता. त्या वेळी बीड, मलकापूर, अंजनगाव सुर्जी, शेगाव, दर्यापूर आदी ठिकाणी पक्षाने मर्यादित यश मिळवले होते. अकोला महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ‘एमआयएम’चा एक नगरसेवक विजयी झाला होता.
८३ जागांपर्यंत मजल
सध्याच्या निवडणुकांत ‘एमआयएम’ने थेट नगराध्यक्षपदासह ८३ जागांपर्यंत मजल मारली आहे. कारंजा नगरपालिकेत फरिदा बानो मो. शफी पुंजानी यांच्या रूपाने प्रथमच ‘एमआयएम’चा नगराध्यक्ष निवडून आला आहे. अकोला जिल्ह्यात सात, बुलढाणा जिल्ह्यात १०, तर वाशिम जिल्ह्यात १८ नगरसेवक निवडून आले आहेत. शेगाव नगरपालिकेत पक्षाचे संख्याबळ दोनवरून चारपर्यंत वाढले आहे. विदर्भात ‘एमआयएम’चे वाढते बळ काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे ठरत आहे.








