Hidden alliance within BJP–Congress in Khamgaon–Shegaon : बार्गेनिंग पॉवर टोकाला; खामगाव–शेगावमध्ये भाजप–काँग्रेस ‘छुपी युती’?
Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांत वेगाने बदलणाऱ्या समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अचानक केंद्रस्थानी आली आहे. महायुतीची शक्यता जवळपास संपुष्टात येत असतानाच या गटाची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली असून “गेमचेंजर” म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
२०१६–१७ मधील निवडणुकीत १९ नगरसेवक निवडून आणणारी एकसंध राष्ट्रवादी पुढे दोन भागांत विखुरली. मात्र बुलढाण्यात अजित पवार गटाने संघटन, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची पकड सिद्ध करत शरद पवार गटापेक्षा स्वतःची ताकद मोठी असल्याचे दाखवून दिले. महायुतीत भाजप–शिंदेसेना यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर या गटाची किंमत झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भाजप व शिंदेसेना (शिंदे गट) युतीची शक्यता दिवसेंदिवस कमी होत असताना राष्ट्रवादी (अ. प.) ने दोन्ही पक्षांशी स्वतंत्र वाटाघाटी जलद केल्या आहेत. ही चर्चा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी (अ. प.) शिवाय विजयाचा मार्ग कठीण असल्याची जाणीव दोन्ही पक्षांना झाली आहे. प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष टी. डी. अंभारे यांच्या नेतृत्वाखाली या वाटाघाटी पुढे सरकत असून ते जिल्हा समन्वयकाची भूमिका बजावत आहेत.
खामगावात अॅड. आकाश फुंडकर आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे ‘दोस्ताना’ सगळ्यांना माहीत. त्यातच शेगावातही अशीच समीकरणे असल्याने या दोन ठिकाणी राष्ट्रवादी (अ. प.) ने सर्वस्वी स्वतंत्र मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यस्थीचे प्रयत्न झाले, पण यश मिळाले नाही.
गटाचा मुख्य भर या दोन्ही नगरपरिषदांवर असून येथे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. मलकापूरमध्ये भाजपशी वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून नगरसेवक पदांचे वाटप जवळपास निश्चित झाले आहे. तडजोड झाल्यास मलकापूरमध्येही राष्ट्रवादी (अ. प.) चा नगराध्यक्ष उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.
Akash Fundkar : नगराध्यक्षपदासाठी फुंडकरांच्या घरातूनच उमेदवारी!
खामगाव व शेगावमध्ये दिलीपकुमार सानंदा यांना रोखण्यासाठी भाजप–काँग्रेसमध्ये गुप्त पातळीवरील संधान झाल्याची चर्चा जोरात आहे. काँग्रेसचा एक प्रमुख नेता पडद्यामागे भाजपशी संपर्कात असून बाजार समितीतील अडीच–तीन हजार कोटींच्या अर्थकारणालाही या राजकीय हलचाली जोडल्या जात आहेत. चिखलीत राष्ट्रवादी (अ. प.) आणि भाजप चर्चेत असून ती ‘सन्मानजनक’ असावी, अशी गटाची अट आहे.








