interested candidates have begun preparations : प्रभाग रचनेसाठी लोकसंख्येची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर
Akola सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेस वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने २०११च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्याची लोकसंख्या ग्रामविकास विभागाकडे सादर केली आहे. यानंतर प्रभाग रचनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्कल (जि.प. गट) रचनेसाठी राजकीय इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. काहींनी संभाव्य मतदारसंघांसाठी चाचपणी सुरू केली आहे.
सन २०२० मध्ये जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर जानेवारी २०२५पूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड आवश्यक होती. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे निवडणुका घेता आल्या नाहीत. निवडणूक आयोगाने जि.प. व पं.स. निवडणुका नियोजित कालावधीत घेता येणार नसल्याचे कळवत प्रशासक नेमण्याचा सल्ला शासनाला दिला होता. त्यानुसार १७ जानेवारी २०२५ पासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक कार्यरत आहेत.
MLA Siddharth Kharat : बुलढाण्यात महाविकास आघाडीचाच डंका, आमदाराला विश्वास
दरम्यान, ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिल्यानंतर, निवडणूक आयोगाने राज्य सरकारला जिल्हा परिषद गट व पंचायत समिती सर्कल निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकसंख्येची माहिती मागवली होती.
मागील पाच वर्षांत स्थानिक जि.प. व पं.स. निवडणुका झालेल्या नाहीत. याच काळात काही गावांचे पुनर्वसन, नवीन गट ग्रामपंचायतींची निर्मिती व गावांचा समावेश जिल्ह्यांत झाल्यामुळे लोकसंख्येत बदल झाल्याची शक्यता आहे. मात्र, अकोला जिल्ह्यात हिवरखेड नगरपालिकेची स्थापना झाल्यामुळे संबंधित सर्कल बाद ठरला आहे. याशिवाय फारसे बदल झाल्याचे समोर आलेले नाहीत.
सन २०२० मधील निवडणुकीवेळी ५३ सर्कलच्या आधारावर राखीव जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी ८, अनुसूचित जमातींसाठी ४ व इतर मागासवर्गीयांसाठी १४ जागा राखीव होत्या. सध्या ५२ सर्कल अस्तित्वात आहेत. आगामी रचनेनुसार सर्कलची संख्या ६० पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, राखीव जागांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.