MLA Gaikwad firmly claims Shiv Sena’s victory : आ. संजय गायकवाड मुलाच्या पाठीशी; शिवसेनेच्या विजयाचा दावा
Buldhana “मतदानाच्या दिवशी घडलेल्या घटनेत माझा मुलगा कुणाल याचे नाव ओढण्याचा जो प्रयत्न झाला, तो फक्त समोर असलेल्या व्यक्तीला मारहाण होऊ नये म्हणून त्याला वाचवत होता. एखाद्याला वाचवणं हा गुन्हा आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय गायकवाड यांनी मुलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत शिवसेनेच्या विजयाचा दावा केला आहे.
मंगळवार, २ डिसेंबर रोजी आयटीआय मतदान केंद्राबाहेर घडलेली घटना राज्यभर चर्चेत आल्यानंतर प्रथमच प्रतिक्रिया देताना आ. गायकवाड म्हणाले की, “निवडणुकीच्या दिवशी काही व्यक्तींनी केलेले आरोप हे केवळ राजकीय नाटक आहे. सकाळपासून बुलढाणा शहर पोलिसांच्या छावणीत बदलल्यासारखे वातावरण होते. हे शहर शिक्षित आणि शिस्तबद्ध आहे, पण पोलिसांची अशी दहशत मी गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात पाहिली नव्हती.”
Local Body Elections : ‘हॉटस्पॉट’ चिखलीत वाढीव मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर?
ते पुढे म्हणाले की, “सतत मुख्यमंत्री कार्यालयाकडून येणारे फोन, बाहेरचे पोलीस, एसआरपी, क्यूआरटी – हे सर्व का उभे केले गेले, हे लोकांना स्पष्ट दिसत होते. अनेक मतदारांना त्यांच्या बूथवर नावेच सापडत नव्हती. माझेही दोन बूथ बदलले गेले. ज्या मतदाराबद्दल ‘बोगस’ असा आरोप केला, तो तर स्वतः चार ठिकाणी जाऊन योग्य बूथ शोधत होता. नाव मिळाल्यानंतर तो विचारायला गेला, तर त्याला मारहाण झाली. तो बूथमध्ये गेला असता, अधिकाऱ्यांनी ओळख तपासली असती; एजंटना जर तो बोगस वाटला असता, तर मीही ते मान्य केले असते. पण तो आत गेला देखील नाही, मग बोगस मतदानाचा प्रश्नच कुठे येतो?”
विरोधकांच्या ‘बुलढाण्याचे बिहार झाले’ या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, “हे स्वतःच्या पराभवाची भीती लपवण्याचा प्रयत्न आहे. बुलढाण्यात कुठलीही मोठी घटना घडलेली नाही. दोन नातेवाईकांमध्ये झालेले किरकोळ वाद ३०० रुपयांत दाखल झाले, हेच त्यांच्या आरोपांचे खरे चित्र आहे.”
Azad Hind Sanghatna : बुलढाण्यात बोगस मतदान रॅकेट; ‘मुख्य सूत्रधार’ कोण?
आ. गायकवाड यांनी आरोप केला की, “हा मुद्दा उभा करण्यामागचे एकच कारण — विरोधी उमेदवाराला स्वतःचा पराभव दिसू लागला आहे. काँग्रेस, उबाठा, तुतारी आणि भाजपच्या उमेदवारांची भाषा, प्रचार व टार्गेट एकच — आम्हाला रोखणे. पण बुलढाणा शहराने आम्हाला दिलेला पाठिंबा त्यांना दिसत आहे.”
ते पुढे म्हणाले, “२१ तारखेला काय निकाल लागणार हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे. महायुतीसाठी आपण काम करतो आणि जिल्ह्यात महायुतीचे मजबूत स्थान निर्माण व्हावे हीच अपेक्षा. येथे विजय शिवसेनेचाच होणार आणि शहरात सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेला मिळणार, हे निश्चित आहे.”








