Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सचिवाची प्रतिष्ठा पणाला

Prestige on the line for Vanchit Bahujan Aghadi’s National Secretary : बाळापूर नगर परिषद निवडणुकीत ‘नगर विकास पार्टी’कडे लक्ष

Akola बाळापूर नगर परिषदेची आगामी निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार एस. एन. खतिब यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. काँग्रेस व ‘नगर विकास पार्टी’च्या नावाखाली सुमारे ६० वर्षे नगर परिषदेतील सत्ता सांभाळणाऱ्या खतिब कुटुंबाच्या नेतृत्वात प्रथमच वंचित बहुजन आघाडीपुरस्कृत ‘नगर विकास पार्टी’ निवडणूक रिंगणात उतरली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या आश्वासनानुसार नगर परिषदेत पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे आव्हान खतिब यांच्यासमोर आहे. त्यामुळेच ही निवडणूक त्यांच्यासाठी केवळ राजकीय नव्हे, तर प्रतिष्ठेची बनली आहे.

Bogus caste certificate : ‘खरे सूत्रधार’ वाचवले जात आहेत, समितीचा आरोप

माजी आमदार खतिब यांच्यासमोर ६५ वर्षांची घराणेशाही कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. नगराध्यक्षपदासाठी पत्नी रजियाबेगम खतिब, तर नगरसेवकपदासाठी पुत्र ऐनोदीन खतिब यांना निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेते, माजी नगराध्यक्ष व शहर काँग्रेसचे अध्यक्ष मो. जमीर शेख इब्राहीम (जम्मू शेठ) यांनी महाविकास आघाडीच्या वतीने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात शहरात राबविलेल्या विकासकामांचा प्रचार सुरू केला असून, शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सोबत पूर्वीचा ‘परिवर्तन पॅनल’ही सक्रिय आहे.

१९९५ पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोणताही मोठा राजकीय किंवा सामाजिक आधार नसतानाही नगरसेवकपद टिकवून ठेवणाऱ्या जमीर शेख यांनी २०१४ च्या नगराध्यक्ष निवडणुकीत घराणेशाहीचा आरोप करत ‘नगर विकास पार्टी’ सोडली. पाच नगरसेवकांसह ‘परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून नगराध्यक्षपद मिळवत अडीच वर्षांच्या काळात प्रशासनाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याने ते माजी आमदार खतिब यांचे तगडे विरोधक म्हणून पुढे आले.

आतापर्यंत नगर परिषदेत खतिब कुटुंबाचीच सत्ता राहिल्याने शहरवासीयांचा राजकीय पाठिंबा त्यांनाच मिळत होता. विरोधकांतील फूट आणि विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याच्या रणनीतीमुळे त्यांनी आपले वर्चस्व टिकवून ठेवले. काँग्रेसमध्ये दबदबा राखत त्यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली, तसेच सहा वर्षे विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले.

CM Devendra Fadnavis : खामगाव–जालना रेल्वेमार्गाच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालणार

मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली, मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही पक्षाने त्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली. आता काँग्रेसने दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करत खतिब यांची घराणेशाही मोडीत काढण्याचे आव्हान उभे केले आहे.

या पार्श्वभूमीवर बाळापूर नगर परिषदेची निवडणूक माजी आमदार एस. एन. खतिब यांच्यासाठी केवळ सत्तेची नव्हे, तर प्रतिष्ठा आणि राजकीय अस्तित्वाची लढाई ठरत असल्याचे चित्र आहे.