Sharad Pawar’s NCP directly attacks Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत पुन्हा एकदा तणावाची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवत बंडखोरांना पुरस्कृत करणाऱ्या काँग्रेस सोबत आघाडी कशी टिकवायची असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या संदर्भात कुंटे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोन बंडखोर याज्ञवल्य जिचकार आणि राजेंद्र मुळक यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवली. निवडणूक संपल्यानंतर लगेच या दोघांनाही काँग्रेसने पुन्हा पक्षात घेतले. फक्त पक्षातच घेतले नाही तर या दोघांना मोठी पदेही देण्यात आली. अशा पद्धतीने काँग्रेस बंडखोरीला प्रोत्साहन देत असेल तर मग आघाडीची शिस्त आणि विश्वास टिकणार कसा?
महाविकास आघाडी आम्हाला अजूनही रस आहे. परंतु काँग्रेसवर विश्वास ठेवणे आता कठीण झाले आहे. आम्ही दगाफटका सहन करणार नाही. पण काँग्रेसनेही प्रामाणिकपणे वागावे आणि आघाडीच्या धर्माचे पालन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, हे सांगताना कुंटे पाटील म्हणाले की, पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसने जनतेसाठी काहीही काम केलं नाही, तर हिंगण्यात आमच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला. अशा दबावाच्या राजकारणामुळे समवचारी पक्षांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि त्याचा फायदा भाजपला होतो.
Local Body Elections : दोन याद्यांमध्ये नाव असलेल्यांकडून घेतले जाणार हमीपत्र !
सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये, या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे समाविचारी पक्षांसोबत आघाडीचा पर्याय आम्ही खुला ठेवला आहे. महाविकास आघाडीला आम्ही प्राधान्य देतो, पण जर काँग्रेसने आपली वचनबद्धता राखली नाही, तर आम्ही स्वतःचा मार्ग निवडणार असेही कुंटे पाटील यांनी सुचित केले. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये प्रचंड मतभेद वाढत असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे गणित कसे असेल, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.








