Silent voters will be the decisive factor : बुलढाणा निवडणुकीत दिग्गजांची अस्तित्वाची लढाई शिगेला
Buldhana नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी तापली असून गटबाजी, नाराजी, शक्तिप्रदर्शन आणि सोशल मीडियावरील प्रचारयुद्धामुळे शहराचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ता टिकविण्यासाठी आणि नातेवाइकांना निवडून आणण्यासाठी दिग्गज नेत्यांनी आक्रमक रणनीती आखण्यास सुरुवात केली असली तरी, यंदाच्या निवडणुकीतील खरा ‘गेम चेंजर’ हा सायलेंट मतदार ठरणार, असा सूर राजकीय चर्चांमध्ये उमटत आहे.
या वेळी नगराध्यक्षपदासाठी तब्बल ७ उमेदवार रिंगणात असून काँग्रेसच्या लक्ष्मी काकस, भाजपच्या अर्पिता शिंदे आणि शिंदेसेनेच्या पूजा गायकवाड यांच्यात मुख्य तिरंगी लढत होत आहे. याशिवाय अहमद रझिया अतिक, उर्मिला सतीशचंद्र रोठे पाटील, बसपाच्या रेखा चव्हाण आणि आपच्या मनीषा मोरे यांनीही जोरदार प्रचार मोहीम उभी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने मात्र अखेरच्या क्षणी उमेदवारी माघारी घेतली आहे.
Local Body Elections : भाजप व वंचितमध्ये थेट लढत; काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष
उमेदवारी वाटपावरून सर्वच पक्षांमध्ये नाराजी, उपशिक्षण आणि गटबाजीचे नाट्य रंगले आहे. ही नाराजी मतांमध्ये रुपांतरित होते का, हा निर्णायक प्रश्न उमेदवारांसमोर आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीत शहराने दिलेला कौल यावेळी कायम राहतो का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील प्रभागांमध्ये रॅली, मोर्चे, ताकद दाखवणाऱ्या टीम्स आणि सोशल मीडियावरील पोस्टर्सचा अक्षरशः पूर आला आहे. चौक-गल्ल्यांमधील कट्टे राजकीय चर्चांनी गजबजले असले तरी, सामान्य मतदार मात्र तोंड बंद ठेवून ‘निरीक्षण’ मोडमध्ये दिसत आहेत. कोणाच्या बाजूला मतदानाचा कल? कोणाला पसंती? याचा आजतागायत ठपका लागत नाही.
बुलढाण्यात मतदानाचा टक्का परंपरेने कमीच राहिलेला आहे. गेल्या निवडणुकीत केवळ ५४.३९% मतदान झाले होते. यावेळीही मतदारांचा शांत कल पाहता मतदानाचा टक्का पुन्हा घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दारोदार भेटी, महिला मेळावे, रॅली, डिजिटल प्रचार, सोशल मीडिया लाइव्ह — उमेदवारांकडून सर्व तंत्रांचा वापर केला जात असला तरी मतदार अजूनही संयमाने सर्वांचे मूल्यमापन करताना दिसत आहेत.
बुलढाण्यातील परंपरागत ‘गटराजकारण’ या समीकरणात यावर्षी अधिक वैयक्तिक घटक मिसळले आहेत. पक्षनिष्ठेपेक्षा उमेदवाराची प्रतिमा, वर्तणूक, उपलब्धता आणि संकट काळात उभे राहण्याची क्षमता याकडे मतदारांचे जास्त लक्ष आहे.
यावेळी प्रचारात महिलांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. महिला उमेदवार तसेच पक्षाच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर घराघरांत पोहोचून मतदारांशी संवाद साधत आहेत. यामुळे निवडणुकीची हवा अधिक तापली आहे.
Krantikari Shetkari Sanghatna : २१ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित
अंतर्गत गटबाजी, तिहेरी लढत आणि नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कोणाचा पलडा जड? याचे उत्तर देणारे सायलेंट मतदारच ठरणार आहेत. मतदारांची ही शांतता उमेदवारांसाठी चिंतेचा तर राजकीय पंडितांसाठी उत्सुकतेचा विषय बनली आहे.








