Local Body Elections : चिखली निवडणुकीत ‘संपूर्ण सस्पेन्स’, बंडखोरी अटळ, राजकीय वातावरण तापलं

Names of the Municipal Council President and councillors still kept under wraps : नगराध्यक्षांसह नगरसेवकांची नावं अद्याप गुलदस्त्यात, चाचपणी सुरूच

Chikhli नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजून सहा दिवस उलटून गेले असले तरी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या उमेदवारांबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम आहे. इच्छुकांनी जोमाने तयारी सुरू केली असली तरी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशा प्रमुख पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने चिखलीत राजकारण तापले आहे.

उमेदवारीचा निर्णय लांबणीवर गेल्याने बंडखोरीची शक्यता प्रचंड वाढली असून अनेकांना पर्यायी मार्ग म्हणून अपक्ष किंवा इतर पक्षांचे दार ठोठवावे लागत आहे. भाजपमध्ये पंडितराव देशमुख आणि डॉ. संध्या कोठारी ही दोन नावे आघाडीवर असली तरी अंतिम नाव कोणते, याबाबत पक्षनेतृत्व मौन आहे.

Local Body Elections : नगराध्यक्षपदावरून रावळ–इंगळे ‘आऊट’!

काँग्रेसमध्ये प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे चर्चेत असताना, राहुल बेंद्रे यांनी खासदार मुकुल वासनिक यांची भेट घेतल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. त्या भेटीत काय ठरले हे गोपनीय ठेवल्याने काँग्रेसमध्येही उमेदवारीचा ताण वाढला आहे. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी जागावाटपाबाबत पडद्यामागील चर्चा सुरू असून सोमवारी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अनेकांनी आपली उमेदवारी ‘पक्की’ असल्याच्या विश्वासावर प्रचाराची तयारी सुरू केली होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत अचानक अनेकांनी इतर पक्षांकडेही दावे दाखल केल्याने ‘ज्यांना तिकीट फिक्स वाटत होते, त्यांनाच आता फिफ्टी-फिफ्टी चान्स’ असे म्हणत परिस्थितीचा अंदाज बांधावा लागत आहे.

शिंदेसेनेने नगराध्यक्षपदासह प्रभागातून अर्ज भरत आपली ताकद दाखवली. राष्ट्रवादीचे अर्ज दाखल झाले असले तरी ते अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे, हे गुलदस्त्यात.

Akash Fundkar : नगराध्यक्षपदासाठी फुंडकरांच्या घरातूनच उमेदवारी!

उद्धवसेनेकडूनही अर्ज दाखल होत असल्याने युती करतात की थेट रिंगणात भिडतात, यावरही सस्पेन्स कायम आहे. भाजपने काही प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांना बाजूला सारत नवीनांना शब्द दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेसमधील स्थितीही तितकीच बिकट — अनेक ठिकाणी उघड विरोध सुरू आहे.

गत निवडणुकीत भाजपने आयात उमेदवारांच्या जोरावर सत्ता काबीज केली होती. त्या काळात भाजप मजबूत झाला आणि काँग्रेस ‘बॅकफूट’वर गेली. काँग्रेसमधील अनेकांनी पक्ष सोडून भाजपकडे झुकत तिकीटासाठी लॉबिंग सुरू केले. आता तेच आयात चेहरे पुन्हा उमेदवारीवर दावा करत असल्याने भाजपचे निष्ठावंत उघड नाराज आहेत. ही नाराजी काँग्रेससाठी ‘सुवर्णसंधी’ ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.