Mistake at campaign rally in front of Praful Patel caught on camera video goes viral : प्रफुल्ल पटेलांसमोरच अजब प्रचार सभेतली ‘चूक’ कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल
Gondia : नगरपरिषद निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात गोंदियात असा प्रकार घडला की संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष एका क्षणात त्या सभेकडे वळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारसभेतच उमेदवाराच्या पतीने “कमळ चिन्हावर बटन दाबा आणि राष्ट्रवादीला विजयी करा” असे आवाहन केल्याने सभेत उपस्थित सर्वजण थेट थक्क झाले.
विशेष म्हणजे, हा ‘गोंधळात टाकणारा’ संवाद स्वतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीतच घडला. मंचावर पटेल बसलेले, सभागृहात कार्यकर्त्यांचा उत्साह टोकाला आणि त्या दरम्यान झालेल्या या वाक्यामुळे क्षणभर संपूर्ण सभेत शांतता!
चूक उमगल्या क्षणीच उमेदवाराचे पती खलील पठाण यांनी तत्काळ माफी मागितली, आणि वाक्य चुकीचे उच्चारले गेले असल्याचे सांगितले. पण तेव्हापर्यंत उशीर झाला होता.
सभेला आलेल्या अनेकांनी हा प्रसंग मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला होता आणि व्हिडिओ पाहताक्षणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत पसरू लागला.
Governments big decision : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा
गोंदियातील 6 क्रमांक वॉर्डातील सभेमधील हा प्रकार आता जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे. निवडणूक प्रचारातील गोंधळ? घाईगडबडीत तोंडचा घोळ? की आणखी काही?
अशा प्रश्नांवर चर्चा पेटली आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील निवडणुकांसाठी प्रफुल्ल पटेल थेट रणांगणात उतरले आहेत. विविध वॉर्डांमध्ये सभा घेत, संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच या सभेत खलील पठाण यांच्याकडून झालेल्या ‘कमळ’ उच्चाराने राष्ट्रवादीच्या प्रचारकार्याची चर्चा वेगळ्याच कारणाने सुरु झाली आहे.
Local Body Elections : मतदार यादीत नाव शोधणे आता अगदी सोपे !
सभेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, या चुकीवरून तुफान चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते या प्रकरणावर भाष्य करत नसले तरी कार्यकर्त्यांच्या गोटात “अनावधानाने चूक झाली” “चर्चा जास्त रंगवली जात आहे” अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. मात्र एकंदरीत, गोंदिया राजकीय वातावरणातला हा “जिभेचा घोळ” निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा चर्चेचा विषय बनला आहे.°°








