LPG crisis : सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

supriya-sule-nana-patole-attack-modi-government-for-lpg-gas-shortage : एलपीजी गॅस तुटवड्यावरून राजकारण तापले; धोरण नसल्याची टीका

Mumbai देशात एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत गॅस तुटवड्यासाठी सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.

गेल्या काही दिवसांत देशातील विविध भागांमध्ये एलपीजी सिलेंडर मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष वेधताना म्हटले की, स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सध्या अनेक ठिकाणी लोकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी टीका त्यांनी केली.

Ashok Dhawad : ३६ वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; त्या माजी आमदाराच्या वाट्याला प्रतिक्षाच!

 

सुळे यांनी असेही म्हटले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती बदलत असली तरी देशांतर्गत नियोजन मजबूत असणे गरजेचे आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी दीर्घकालीन धोरण आवश्यक असून त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही, असे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत योग्य नियोजन न केल्यामुळे सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढती महागाई आणि गॅस मिळण्यात होणारा उशीर यामुळे गृहिणींचे दैनंदिन जीवन अधिक कठीण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

“सरकार केवळ घरगुती गॅस उपलब्ध करून देऊ शकते, मात्र व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देऊ शकत नाही,” असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्याचा दावा पटोले यांनी केला. तसेच कोरोना काळातील उदाहरण देत ते म्हणाले की, “त्या काळात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशाच्या सीमा बंद करण्याचा सल्ला दिला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो सल्ला न ऐकल्याने भारताला मोठी किंमत मोजावी लागली.”

Mumbai Municipal Council : आमदार-खासदारांना ३ वर्षांत १६०० कोटींचा निधी

“फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. गॅस तुटवड्यामुळे लहान व मोठ्या उद्योगांनाही फटका बसला असून काही कारखाने बंद पडल्याची स्थिती आहे. या परिस्थितीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि यासंदर्भातील प्रश्न सभागृहात विचारणार आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्याच्या परिस्थितीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्याच्या साखळीवर परिणाम झाला असून एलपीजी वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. भारत हा मोठ्या प्रमाणात गॅस आयात करणारा देश असल्यामुळे या परिस्थितीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होऊ शकतो.

काही औद्योगिक भागांमध्ये या तुटवड्याचा परिणाम उद्योगांवरही होत असल्याचे दिसून आले आहे. पुणे परिसरातील काही उद्योगांना गॅस अभावी उत्पादन कमी करावे लागल्याची माहिती समोर आली आहे.