demand-of-new-university-for-buldhana-washim-akola-maharashtra-assembly : अकोला, बुलढाणा व वाशीमसाठी विधानसभेत जोरदार मागणी
Buldhana विदर्भातील उच्च शिक्षणाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा राजकीय धार मिळाली असून, बुलढाणा, अकोला आणि वाशीम या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरकसपणे पुढे आली आहे. आमदार धिरज लिंगाडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारसमोर विद्यार्थ्यांच्या अडचणींचा ठोस पाढा मांडला.
सध्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाच जिल्ह्यांतील ५०० हून अधिक महाविद्यालये कार्यरत आहेत. वाढत्या कामकाजामुळे विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा ताणली गेल्याने परीक्षा व्यवस्थापनात विलंब, निकाल जाहीर होण्यात अनियमितता आणि महाविद्यालयांच्या देखरेखीत अडचणी निर्माण होत असल्याचे लिंगाडे यांनी निदर्शनास आणून दिले.
March End : ‘मार्च एन्ड’ वसुलीचा जोर; पण शेतकरी दुर्लक्षितच!
युजीसीच्या शिफारशींचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, ३०० पेक्षा अधिक महाविद्यालये असलेल्या विद्यापीठांचे विभाजन करून नवीन विद्यापीठ स्थापन करणे आवश्यक ठरते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार राज्य सरकारला असा निर्णय घेण्याचा अधिकारही आहे, असे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी अमरावतीला सुमारे १५० किमी प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ, पैसा आणि राहण्याच्या सोयींच्या समस्या विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहतात. या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे नवीन स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची गरज त्यांनी ठळकपणे मांडली.
यावेळी बुलढाण्यात संत गजानन महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी सभागृहात मांडला. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मंत्र्यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
Election commission : मतदारयाद्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी; एप्रिलमध्ये ‘एसआयआर’ मोहीम
दरम्यान, या मागणीमुळे विदर्भातील शैक्षणिक विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला असून, आगामी काळात सरकारची भूमिका काय राहणार, याकडे विद्यार्थ्यांसह स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.








