Congress state president Harshawardhan Sapkal attaks on Amit shah पद शाबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्वांची धडपड
Mumbai : दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहीणीला २१०० रुपये अशा वल्गना आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केल्या होत्या. मात्र आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर येथे येऊनही ते चकार शब्द बोलले नाहीत. महाराष्ट्र नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. पद शाबूत राहावे, यासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते सर्व मंत्री धडपड करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
मुंबईतील गांधी भवन येथे सपकाळ यांनी काल (ता. २७) पत्रकार परिषद घेतली. दिल्लीला जाण्यापूर्वी अमित शाह यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषीत करायला पाहिजे होती. कारण त्यांनी सांगितल्याशिवाय राज्य सरकार काहीच करू शकत नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्राला संकटात ढकलण्याचे काम महायुती सरकार करत आहे, असेही सपकाळ म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
मुसळधार पावसाने महायुती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तर मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा अहवाल एमएमआरडीएने दिला होता. पण केवळ काही लोकांच्या हट्टापायी हा प्रकल्प राबवला गेला. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण करण्यात आला आहे.
सत्ताधाऱ्यांचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडला. त्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारला दोष देऊन मोकळे होण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेबरोबर भाजप गेली २५ वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होती. एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. मग या काळात भाजप व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न हर्वषवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. आरोप – प्रत्यारोपाचा खेळ सोडून सरकारने आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी, असेही ते म्हणाले.