Maharashtra politics : चर्चा झाली आहे, काही गोष्टी ठरल्या आहेत

Eknath Shindes announcement on BJP-clash : भाजप–शिवसेना संघर्षावर एकनाथ शिंदे यांची घोषणा

Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत महायुतीतून येत असलेल्या वादाच्या ठिणग्यांनी राज्याचे राजकारण तापवले असताना अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडून भाजप–शिवसेना संघर्षावर मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे” या विधानानंतर महायुतीत अविश्वास, तणाव आणि नाराजी वाढल्याची चर्चा रंगली होती. त्यातच शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडी आणि ठाण्यातील मारामारीनंतर युतीतील परिस्थिती आणखीच ढवळून निघाली. या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदेंनी “आमची चर्चा झाली आहे आणि काही गोष्टी ठरल्या आहेत” असे स्पष्ट विधान केले आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाचा लोंढा पाहिल्यानंतर शिंदे गटात तीव्र नाराजी पसरली होती. दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर फोडाफोडीला ब्रेक लागला असला तरी भाजपा कार्यकर्त्यांनीच शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ले केल्याचा आरोप होताच संघर्ष आणखी गंभीर झाला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आहे. महायुती मजबूत राहावी हा आमचा स्पष्ट हेतू आहे” असे सांगत परिस्थिती नियंत्रणात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra politics : “दोन नंबरला काही किंमत नसते”

वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिंदेंनी स्पष्ट केलं की शिवसेना नेहमीच युती धर्म पाळत आली आहे. “ही युती अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. स्थानिक पातळीवरील काही नेते वक्तव्यं करतात परंतु आमची चर्चा झाली आहे. यापुढे शिवसेनेचे नगरसेवक भाजपात जाणार नाहीत आणि भाजपा शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. हे आम्ही ठरवलं आहे” असे त्यांनी सांगितले.

शिंदेंनी हेही स्पष्ट केलं की त्यांच्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणताही वाद नाही. “खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. ज्यांच्यासाठी खुर्ची महत्त्वाची होती त्यांचं सरकार गेलं. आमचा अजेंडा विकासाचा आहे. महायुतीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आहोत. कुणी भाजपाचा नगरसेवक असेल तर त्याला शिवसेनेत घेऊ नका, असं मी परवाच वाड्यातही सांगितलं” असे ते म्हणाले.

Ballarpur Municipal Elections : बल्लारपूरमध्ये ‘कमळ’ लहर, मतदानापूर्वीच जिंकली लढाई!

 

महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर भाजप–शिवसेना कार्यकर्त्यांमधील तणाव, एकमेकांविरोधातले आरोप आणि परस्परांच्या घरात घुसून फोडाफोडीच्या मोहिमा सुरु असताना मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरल्याने आता महायुतीतील राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या सलग दोन स्फोटक विधानांनंतर शिंदेंची ही भूमिका केवळ डॅमेज कंट्रोल की भविष्यातील तणावाची पूर्वतयारी? यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तथापि, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्यानुसार “चर्चा झाली आहे आणि काही गोष्टी ठरल्या आहेत” या संदेशामुळे महायुतीचा तणाव तात्पुरते का होईना, कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र समोर येत आहे.

____