23 months’ coronavirus allowance remains unpaid : पंचायत समितीसमोर आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन; १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा
Deuogaoraja कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा ग्रामपंचायत स्तरावरील तब्बल २३ महिन्यांचा कोरोना भत्ता अद्याप थकीत असल्याच्या निषेधार्थ आज पंचायत समिती कार्यालयासमोर सीटूच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शासन व प्रशासनाच्या उदासीन धोरणांविरोधात यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
राज्य व जिल्हा पातळीवरून स्पष्ट लेखी आदेश असतानाही ग्रामपंचायतींकडून कोरोना भत्ता देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. या मागणीसाठी सीटू संघटनेने राज्य आयुक्तांपासून ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सांगण्यात आले.
Ajit Pawar death news : मातृतीर्थ पोरके! सिंदखेडराजाच्या विकासासाठी अखेरपर्यंत तळमळ
कोरोना महामारीच्या काळात अत्यल्प मोबदल्यात या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, स्थलांतरितांचा सर्वे, कोविड-१९ संदर्भातील जनजागृती, महाआयुष्यमान भारत सर्वे आदी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ‘हेल्थ लीडर’ ही उपाधी देऊन सन्मान केला. मात्र एवढे मोठे योगदान असूनही शासनाकडून योग्य मोबदला न मिळाल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्यात ५ जानेवारीपासून विविध तालुक्यांत आंदोलन सुरू असून, २७ जानेवारी रोजी देऊळगाव राजा येथे दहावे आंदोलन पार पडले. स्थानिक प्रशासनाने हा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अन्यथा १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा ठाम इशारा सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी दिला.
दरम्यान, पंचायत समितीचे संवर्धन विकास अधिकारी वायाळ यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना तातडीने कार्यवाहीसंदर्भात लेखी आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. या आंदोलनात सीटूचे पदाधिकारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच अर्धवेळ स्त्री परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.








