Relief for Ration Card Holders in Buldhana : निवडणुकीच्या तोंडावर ‘गहू’ कार्ड? अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २१ किलो गहू मिळणार
Buldhana आगामी निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) मोठे फेरबदल केले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेशन दुकानांमधून ज्वारीचे वितरण पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याऐवजी गहू आणि तांदळाच्या वाटपात लक्षणीय वाढ केली आहे. शासनाचा हा निर्णय जिल्ह्यतील लाखो गरजू कुटुंबांना राजकीय दिलासा मानला जात आहे.
लोकसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘राशन’ हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने अंत्योदय कार्डधारकांच्या वाटपात मोठा बदल केला आहे. यापूर्वी मिळणाऱ्या १५ किलो गव्हाऐवजी आता थेट २१ किलो गहू मिळणार आहे. १४ किलो तांदळाचे वितरण निश्चित करण्यात आले आहे. गव्हाच्या प्रमाणात केलेली ही वाढ सर्वसामान्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने टाकलेले ‘राजकीय पाऊल’ असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रेशनवर मिळणाऱ्या ज्वारीच्या दर्जाबाबत विरोधकांनी आणि लाभार्थ्यांनी मोठे रान उठवले होते. अनेक ठिकाणी ज्वारी किडलेली आणि निकृष्ट असल्याच्या तक्रारी होत्या. हमीभावाने खरेदी केलेली ज्वारी संपल्याचे तांत्रिक कारण दिले जात असले, तरी निकृष्ट धान्यावरून होणारी राजकीय टीका टाळण्यासाठी सरकारने ज्वारी बंद करून गहू उपलब्ध करून दिल्याचे बोलले जात आहे.
Mahavitaran : महावितरणचा ‘रामभरोसे’ कारभार; मोताळ्यात अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीलाच दिले निवेदन!
प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रति सदस्य ५ किलो धान्याच्या वाटपातही बदल करण्यात आला आहे. आता लाभार्थ्यांना ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू याप्रमाणे धान्य मिळेल. ज्वारीच्या अनुपस्थितीत गव्हाचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
Anil Bonde Vs Navneet Rana : बावनकुळेंच्या उपस्थितीत अनिल बोंडे–नवनीत राणांमध्ये खडाजंगी
एकीकडे गव्हाचे प्रमाण वाढवून सरकारने दिलासा दिला असला, तरी रेशनवर नियमित साखरेचे वितरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. साखरेच्या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा सरकारला घेरण्याची शक्यता असल्याने, आगामी काळात साखरेबाबतही शासन काही निर्णय घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








