Malkapur Municipal Council : सत्तासंघर्षात अॅड. हरीश रावळ ठरले ‘किंगमेकर’!

Power tussle throws up Adv. Harish Rawal as kingmaker : निवडणूक निकालापासून उपाध्यक्ष निवडीपर्यंत रावळांचा राजकीय करिष्मा

Malkapur निवडणूक म्हटली की राजकीय डावपेच, आरोप–प्रत्यारोप आणि प्रतिस्पर्ध्याचा ‘गेम’ करण्याचे प्रयत्न अटळ असतात. नुकत्याच झालेल्या मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी अंतर्गत व बाह्य पातळीवर अनेक राजकीय खेळ खेळले गेले. मात्र निवडणूक निकालानंतर काँग्रेस संपली, शहरातून काँग्रेस हद्दपार होणार अशा वल्गना करणाऱ्यांना अक्षरशः तोंडात बोटे घालावी लागली. या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये अॅड. हरीश रावळ यांनी काँग्रेसला दिलेली उभारी आणि उपाध्यक्ष निवडीत अनिल गांधी यांना विजयी करून दाखवलेला डाव यामुळे तेच मलकापूरच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ ठरल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

तब्बल नऊ वर्षांनंतर मलकापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड आणि नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदासाठी अॅड. हरीश रावळ, राजेंद्र वाडेकर, शामकुमार राठी यांच्या स्नुषा चेतना बोंबटकार-राठी, अनिल जैस्वाल, अॅड. जावेद कुरेशी, डॉ. अरविंद कोलते यांची नावे चर्चेत होती.

Akola Municipal Election : भाजपला दहा जागांचा फटका; काँग्रेसची भरीव कामगिरी, मनपात त्रिशंकू स्थिती

नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधीलच नेत्यांमध्ये एकमेकांचा ‘राजकीय गेम’ करण्याची जणू स्पर्धा सुरू होती. माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख यांच्या स्नुषा सौ. हर्षिता रोहन देशमुख, अॅड. हरीश रावळ, माजी गटनेते राजेंद्र वाडेकर आणि अनिल गांधी यांना कोणत्याही परिस्थितीत नगर परिषदेच्या सत्तेतून बाहेर काढण्याचा कुटील डाव रचण्यात आल्याची खमंग चर्चा निवडणूक काळात रंगली होती. मात्र या डावात राजेंद्र वाडेकर यांचा पराभव झाला, तर इतर तिघांनी हा डाव मोडीत काढत आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवले, अशी चर्चा आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत परस्परांचे पाय ओढण्यातच ऊर्जा खर्च झाल्याने अखेर अवघ्या महिनाभरापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अतिकूर रहेमान जवारीवाले यांना पक्षाने उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला. या निर्णयानंतर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक हिंदू–मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही झाला. नवख्या उमेदवाराला तिकीट दिल्याने काँग्रेस संपणार, शहरातून पक्ष हद्दपार होणार अशा वल्गनाही करण्यात आल्या.

Akola Municipal Election : भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर धारदार शस्त्राने हल्ला

 

मात्र २१ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालाने सारे अंदाज फोल ठरवले. अतिकूर रहेमान जवारीवाले यांनी सर्व १५ प्रभागांत मताधिक्य घेत नगराध्यक्ष पद पटकावले, तर काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून येत नगर परिषदेत पुन्हा एकहाती सत्ता प्रस्थापित झाली. यामुळे काँग्रेसविरोधकांना जोरदार धक्का बसला.

निवडणुकीनंतर उपाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली. अनिल गांधी आणि राजू पाटील ही दोन नावे चर्चेत होती. वरिष्ठ नेत्यांचा कल राजू पाटील यांच्याकडे असला तरी “निवडून आम्ही आलो, निर्णय आम्ही घेऊ” अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी घेतली. पक्ष निरीक्षकांसमोर झालेल्या बैठकीत १५ पैकी केवळ दोन नगरसेवकांनी राजू पाटील यांना पाठिंबा दिला, चार नगरसेवक तटस्थ राहिले, तर तब्बल नऊ नगरसेवकांनी अनिल गांधी यांच्या नावाला संमती दिल्याचे समजते.

Rane and Thackeray : संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दार आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीही फरक नाही !

या निर्णायक टप्प्यावर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अॅड. हरीश रावळ यांनी पुढाकार घेत आपल्या खंदे समर्थक अनिल गांधी यांना उपाध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण घडामोडींमुळे निवडणूक काळात व उपाध्यक्ष निवडीत काँग्रेसविरोधात छुपी यंत्रणा राबवणारे नेते तोंडघशी पडले असून, अॅड. हरीश रावळ यांचा राजकीय करिष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

मलकापूर नगर परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीतून ते उपाध्यक्ष निवडीपर्यंत अॅड. रावळ यांनी खेळलेला डाव पाहता, तेच आता मतदारसंघातील खरे ‘किंगमेकर’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.