
aimim-mayor-sambhajinagar-imtiaz-jaleel-claim : इम्तियाज जलील यांचा दावा; म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमकडून उमेदवार दिला जाणार असल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता संभाजीनगरच्या महापालिकेत काहीतरी धक्कादायक घडू शकते, असे संकेत देत जलील यांनी महापौरपदाच्या निवडणुकीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. 10 तारखेला महापौरपदाची निवडणूक असून त्या दिवशीच सर्व पत्ते उघडू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 33 नगरसेवक विजयी झाले असून हा पक्ष महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 57 नगरसेवक निवडून आणत पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला असला तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठण्यात भाजप एक जागेने कमी पडला आहे. त्यामुळे भाजपला सत्ता मिळणार की विरोधी पक्ष एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे आणखी मोठी जबाबदारी; शासन निर्णय जारी
महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना इम्तियाज जलील यांनी सांगितले की, एमआयएम विविध पक्षांशी चर्चा करत आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचाही विचार होऊ शकतो. काहीतरी वेगळं घडू शकतं, असं म्हणत त्यांनी संभाव्य आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपविरोधात एमआयएम, दोन्ही शिवसेना आणि इतर पक्ष एकत्र येणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या 115 असून महापौरपदासाठी 58 नगरसेवकांचे पाठबळ आवश्यक आहे. भाजपकडे 57 नगरसेवक असल्याने त्यांना सत्तेसाठी एका नगरसेवकाची गरज आहे. भाजप वगळता इतर सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे शक्य आहे. मात्र अशी आघाडी प्रत्यक्षात येणे अवघड मानले जात असले तरी अलीकडच्या राजकीय घडामोडी पाहता काहीही शक्य असल्याचे चित्र आहे.
सध्या महापालिकेतील संख्याबळ पाहता एमआयएमचे 33, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे 13, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 4, काँग्रेसचा 1 आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक आहे. हे सर्व पक्ष एकत्र आल्यास बहुमताचा आकडा पूर्ण होऊ शकतो. मात्र राज्यातील महायुतीची समीकरणे लक्षात घेता भाजप-शिवसेना युती सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार की विरोधक काही नवे राजकीय समीकरण उभे करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रवादीचे नेतृत्व का दिले, शपथविधी घाईत का झाला?
दरम्यान, एमआयएमच्या 33 विजयी नगरसेवकांपैकी 16 नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये काही नगरसेवकांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचा, तर काहींनी शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. काही नगरसेवकांवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी असून त्यांच्या नगरसेवकपद रद्द करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र या प्रक्रियेला अद्याप वेळ लागण्याची शक्यता आहे.
___








