Eknath Shinde leaves for village after deciding register as an independent group : स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय घेत एकनाथ शिंदें गावाकडे रवाना
Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप महापौरपदाचा पेच सुटलेला नाही. मुंबईच्या महापौरपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरूच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात या मुद्द्यावर अधिकृत चर्चा झाल्याचे कोणतेही संकेत अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे मुंबईच्या सत्तास्थापनेबाबत अनिश्चितता कायम आहे.
महानगरपालिकेत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि अन्य समित्यांमध्ये योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र, या मागणीवरून भाजप आणि शिंदे गटात मतभेद वाढले. विशेषतः निवडणुकीनंतर शिंदे गटाने आपल्या २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवत दबावाचे राजकारण केल्यानंतर दिल्लीतील भाजप नेतृत्व नाराज झाल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईच्या महापौरपदावर कोणतीही तडजोड करू नका, असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे बोलले जाते.
Latur Political Analysis : औशाच्या रणांगणात ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; भाजपची रणनीती यशस्वी?
या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा निकाल लागूनही महायुतीचा महापौर अद्याप विराजमान होऊ शकलेला नाही. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी मुंबई सोडून सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावाकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते साताऱ्याला गेल्याचे सांगितले जात असले तरी शिवसेना आणि भाजप यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची कुजबुज राजकीय गोटात सुरू आहे.
दरम्यान, भाजपकडून मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी करण्याचा आग्रह धरण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे हे सध्या दरे गावात असल्याने मंगळवारी राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे हे शिंदे गटाच्या नगरसेवकांना घेऊन सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात गटनोंदणीसाठी जाणार आहेत. दुपारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे सर्व नगरसेवक एकत्र येतील, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन बसने कोकण भवनाकडे रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेचच दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत महापौरपदावरून शिवसेना – भाजपमध्ये प्रचंड राजकीय हालचाली झाल्या. याच काळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. मात्र, दिल्लीतील भाजप नेतृत्वाने या दबावाला भीक न घालता महापौरपदावर ठाम भूमिका घेतली. त्यानंतर शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमधून परतले होते.
E-Governance : १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचे निकाल जाहीर
देवेंद्र फडणवीस दावोसहून परतल्यानंतर आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत असतानाही दोन्ही नेत्यांमध्ये महापौरपदावरून कोणतीही ठोस बैठक झाल्याचे समोर आले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाने स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय घेतल्याने मुंबईच्या महापौरपदाबाबत आणि सत्तावाटपावर भाजप आणि शिंदे सेनेत अपेक्षित एकमत न झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात पुढील काही दिवसांत अधिक रंजक आणि नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








