Uproar Against Administration Over Education Issues in Municipal Council Meeting : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोपांची आतषबाजी; शाळा दुरुस्तीच्या मुद्यावर सभापतींचा संताप
Mehkar नगरपरिषदेच्या सर्वपक्षीय नगरसेवक व नगराध्यक्षांनी यापूर्वी बहिष्कार टाकल्यामुळे रखडलेल्या सर्वसाधारण सभेनंतर बुधवारी पार पडलेली मेहकर नगरपरिषदेची सभा पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांकडे मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप शिक्षण सभापती डॉ. सौ. दीपिका रहाटे यांनी करत प्रशासनावर थेट निशाणा साधल्याने नगरपरिषद राजकारणात खळबळ उडाली आहे.
नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ३ च्या जीर्ण इमारतीची दुरुस्ती, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालय उभारणी आणि शैक्षणिक सुविधांबाबतचे प्रस्ताव पुन्हा एकदा सभेच्या चर्चेतून डावलण्यात आल्याचा आरोप करत डॉ. रहाटे यांनी संतप्त भूमिका घेतली. “चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासन वारंवार या विषयाला बगल का देत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Nagpur Shivsena : ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’, शिवसेनेचे ‘चॉकलेट’ आंदोलन
पत्रकारांशी बोलताना डॉ. रहाटे म्हणाल्या की, शाळा क्रमांक ३ ची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. शाळेसाठी नवीन इमारत उभारण्याकरिता जागेची अडचण असल्याने स्वीकृत नगरसेवक अजय उमाळकर यांनी स्वतः जागा खरेदी करून नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्याची तयारी अनेकदा दर्शविली आहे. त्या ठिकाणी शाळेची नवीन इमारत उभारण्याची मागणी सदस्यांनी वारंवार केली असतानाही प्रशासनाने गांभीर्य दाखवले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
याआधी १३ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतही शिक्षण विभागाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने डॉ. रहाटे यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना सभेत धारेवर धरले होते. त्यांच्या भूमिकेला विविध पक्षांच्या सदस्यांसह नगराध्यक्ष गटातील काही सदस्यांनीही पाठिंबा दिला होता. परिणामी, सदस्यांनी सभात्याग करत सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला होता.
मात्र, यावेळीही शिक्षणविषयक मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत डॉ. रहाटे पुन्हा आक्रमक झाल्या. शाळेच्या इमारत दुरुस्तीचा विषय विषयसूचीतून वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांकडे दुर्लक्ष करून नगरपरिषद प्रशासन काही निवडक कामांना प्राधान्य देत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
नगरपरिषदेकडून गाळे उभारणी सारख्या प्रकल्पांमध्ये निधी गुंतविला जात असला, तरी अनेक गाळे अद्याप हस्तांतरित न झाल्याने उत्पन्नही मिळत नसल्याचे सांगत रस्ते, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण सभापतींकडून प्रशासनावर थेट टीका झाल्याने मेहकरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.








