mehkar-mla-siddharth-kharat-viral-video-amit-deshmukh-loyal-vs-betrayal : ‘यारी में गद्दारी नहीं!’ सोशल मीडियावरील पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; बंडखोर की मित्रपक्षाला टोला?
Mehkar बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एका व्हिडिओने चांगलाच खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यातील संवाद अतिशय सूचक मानले जात आहेत. “जिंदगी में एक ही उसूल याद रखना, यारी में गद्दारी नहीं, गद्दारों से यारी नहीं!” या संवादाने जिल्ह्याच्या राजकारणात ‘कोणाची कोणाशी गद्दारी?’ आणि ‘खरात यांचा निशाणा नक्की कोणावर?’ अशा चर्चांना तोंड फुटले आहे.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी ही पोस्ट अशा वेळी केली आहे, जेव्हा स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. महाविकास आघाडीत (MVA) सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जाते. हा व्हिडिओ पक्षांतर्गत छुपी बंडाळी करणाऱ्यांना दिलेला इशारा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांना किंवा विरोधकांना आपली ताकद आणि निष्ठा दाखवण्यासाठी हा ‘डिजिटल वार’ केल्याचे बोलले जात आहे.
मंत्रालयात सहसचिव म्हणून काम केलेले सिद्धार्थ खरात यांनी २०२४ च्या निवडणुकीत मोठी मजल मारत विजय मिळवला. त्यांच्या या नव्या ‘बोल्ड’ शैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आमदार खरात यांनी त्यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, ज्यामुळे या पोस्टचे गूढ अधिकच वाढले आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत असून, “आमदार साहेब, इशारा कोणाला?” असे प्रश्न थेट विचारले जात आहेत.
मेहकर विधानसभा मतदारसंघात पराभवानंतर शिंदे गट पुन्हा सक्रिय होत असतानाच, खरात यांनी ‘गद्दारी’ शब्दाचा केलेला वापर थेट त्यांच्या विरोधकांना (संजय रायमुलकर गट) डिवचण्यासाठी आहे की आघाडीतीलच काही विसंगतींवर बोट ठेवण्यासाठी, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, एका छोट्या व्हिडिओने पूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेण्यात खरात यशस्वी झाले आहेत.








