Right to decide belongs constituent parties of India Alliance – Sapkal : निर्णयाचा अधिकार इंडिया आघाडीतील घटक पक्षांना – सपकाळ
Mumbai: राज्यातील मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. “या शिष्टमंडळाचा उद्देश मतदार याद्यांतील घोटाळे व निवडणूक प्रक्रियेतील दोष याकडे आयोगाचे लक्ष वेधणे हा होता. यात कोणत्याही पक्षाच्या आघाडीत समावेशाचा प्रश्नच नव्हता,” असे त्यांनी सांगितले.
सपकाळ म्हणाले, “१३ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शिष्टमंडळातील नेत्यांची नावे स्पष्ट केली होती. त्यानुसार बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड हे सहभागी झाले. मी दिल्लीतील बैठकीमुळे अनुपस्थित होतो.”
Farmers in Trouble : ‘जळाला रे जळाला..’ म्हणत फसवे परिपत्रक जाळले !
त्यांनी पुढे सांगितले की, “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीतील घोटाळ्यांचा पर्दाफाश पुराव्यासह केला आहे. यात महाराष्ट्रातील कामठी आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील घोटाळ्यांचाही समावेश आहे. या माहितीची देवाणघेवाण काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) सोबत केली आहे.”
राज ठाकरे आणि महाविकास आघाडीविषयी विचारल्यावर सपकाळ म्हणाले, “मनसेकडून आघाडीत सहभागी होण्यासाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अशा निर्णयाचा अधिकार इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडे आहे.”
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संवादाच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, “राऊत यांच्याशी संवाद झाला आहे आणि पुढेही तो सुरु राहील. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देईन.”








