Money showered : अकोल्यात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेत कळसावरून नोटांची उधळण

akola-hanuman-idol-installation-money-showered-from-temple-dome-devotees-stampede-like-situation : भाविकांची झुंबड, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Akola : जिल्ह्यातील मनारखेड (ता. बाळापूर) येथे हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात कळसावरून नोटा आणि नाण्यांची उधळण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी उसळली असून नोटा वेचण्यासाठी भाविकांनी झुंबड घातल्याने काही काळ चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

गावात नव्याने स्थापित करण्यात आलेल्या हनुमान मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर मंदिराच्या कळसावरून १०, २० आणि ५० रुपयांच्या हजारो नोटांची उधळण करण्यात आली. यासोबतच ५ आणि १० रुपयांची नाणीही मोठ्या प्रमाणावर उधळण्यात आली. नोटांची उधळण होताच उपस्थित भाविकांनी त्या गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली.

Amravati Airport : एप्रिलपासून अमरावती विमानतळावर ‘नाइट लँडिंग’; डीजीसीएची चमू पाहणीसाठी येणार

काही भाविकांनी मंदिर परिसरात उभारलेल्या मंडपावर चढण्याचा प्रयत्न केला, तर काहीजण वाऱ्याच्या दिशेने उडणाऱ्या नोटांच्या मागे धावताना दिसून आले. वाऱ्यामुळे नोटा मंदिर परिसरापासून दूरवर उडून गेल्याने त्या मिळवण्यासाठी भाविकांची धावपळ वाढली. या गोंधळात काही काळ चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नसल्याची माहिती समोर आली आहे.

कार्यक्रमादरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना नियोजनाचा अभाव जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. भविष्यात अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Budget session : अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

दरम्यान, गावकऱ्यांनी या प्रकाराचे समर्थन करत ही आमच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा एक भाग असल्याचे सांगितले. अनेक भाविकांनी वेचलेल्या नोटा आणि नाणी घरातील देव्हाऱ्यात ठेवणार असल्याचे सांगितले. मात्र सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे नोटांची उधळण करणे कितपत योग्य आहे, यावरून प्रशासन आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. धार्मिक उत्साह आणि सार्वजनिक सुरक्षेचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

___