Support from all party leaders, see what the exact demands are : सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा, पहा नेमक्या मागण्या काय?
Pune : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक भरतीच्या जाहिरातीत झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या वयोमर्यादेच्या प्रश्नावर पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी मध्यरात्री रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रात्री सुमारे १.१३ वाजता पुण्यातील शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांनी बसून आंदोलन सुरू केले. मात्र आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनास परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी विद्यार्थ्यांना मध्यरात्री रस्त्यावरून हटवले.
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेत अडकत असल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. राज्यभरात एमपीएससीच्या विविध परीक्षा देणारे विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून या प्रश्नावर सरकारकडे निवेदने देत आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यातील शास्त्री रोडवर मध्यरात्री आंदोलन करण्यात आले.
Local body election : जादूटोण्याच्या आरोपांपासून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीपर्यंत…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४ जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ घेतली जाणार आहे. या परीक्षेची जाहिरात मात्र तब्बल सात महिन्यांच्या विलंबानंतर २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीत वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. जाहिरात उशिरा आल्यामुळे अनेक उमेदवार या गणना दिनांकामुळे अपात्र ठरण्याची शक्यता असून, त्यांच्या हातून महत्त्वाची संधी हिरावली जाणार असल्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा किमान एका वर्षाने वाढवावी, तसेच वयोमर्यादा गणनेसाठी १ जानेवारी २०२५ हा दिनांक ग्राह्य धरावा, अशी ठाम मागणी केली आहे. सरकारने वेळेत जाहिरात न काढल्याची चूक विद्यार्थ्यांवर लादू नये, अशी भावना आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या आंदोलनाला राजकीय पाठिंबाही मिळू लागला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी या आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, एमपीएससी पीएसआय वयोमर्यादा वाढीच्या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. ८० हून अधिक लोकप्रतिनिधींमार्फत सरकारकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे विद्यार्थी शांततामय आणि गांधी मार्गाने पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आपण स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बच्चू कडू यांनी उपआयुक्त पोलीस रावळे यांच्याशी चर्चा झाल्याचा उल्लेख करत पोलिसांकडून विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचेही सांगितले. विद्यार्थ्यांनी कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Local Body Elections : काँग्रेस–शिंदेसेना बलाढ्य असूनही सत्तेची चावी तिसऱ्याच हातात!
एकीकडे विद्यार्थ्यांचा संताप वाढत असताना, दुसरीकडे आचारसंहितेचे कारण पुढे करत पोलिसांकडून आंदोलन थांबवण्यात येत असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्ये नाराजी आहे. पोलीस उपनिरीक्षक भरतीतील वयोमर्यादेचा हा प्रश्न सरकार कधी सोडवणार, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होणार का, याकडे आता संपूर्ण राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष लागले आहे.








