Breaking

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana : शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार, नागपूर टास्क फोर्सचा दावा

Nagpur Task Force claims that farmers will be provided with electricity during the day : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक; ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेची अंमलबजावणी

Nagpur राज्याचे मुख्यमंत्री हे ऊर्जामंत्री देखील आहेत. पण त्यांच्या गृह जिल्ह्यातच गेल्या सहा महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अख्खा जिल्हा महावितरणच्या गलथान कारभाराने त्रस्त आहे. अश्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ MSKVY 2.0 या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नागपूर टास्क फोर्सची बैठक अलीकडेच नागपुरात पार पडली.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेत नागपूर टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे व संजय वाकडे, तसेच स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता नारायण लोखंडे आदी उपस्थित होते. योजनेच्या अंलबजावणीसाठीच नागपूर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, हे विशेष.

Nagpur Vidhan Bhavan : विधानभवनाचा विस्तार ठरला; शासकीय मुद्रणालय देणार जागा

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी येथील प्रकल्पाचे निरीक्षण महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागपूर जिल्ह्यात ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडून येईल, असा दावाही त्यांनी केला.

Maharashtra Legislative Council Monsoon Session : दिव्यांग आय़ुक्त होणार निलंबित, आमदार संदीप जोशींनी वेधले होते लक्ष !

जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही. रात्रीच्या सुमारास वीज आल्यानंतर अंधारात पाणी टाकणे व इतर कामे करावी लागतात. त्यातून अनेकदा अपघात किंवा श्वापदांचा हल्ला असे प्रकार घडतात. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश यावर्षी किमान ३० टक्के कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जेमध्ये रूपांतर करणे हा आहे. यासाठी १६ हजार मेगावॅट सौरऊर्जा उत्पादन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.