mumbai-mayor-ritu-tawde-car-red-blue-lights-controversy-milind-narvekar-reaction : व्हीआयपी संस्कृती परतली का? मिलिंद नार्वेकरांचा सवाल
Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावण्यात आलेल्या लाल आणि निळ्या फ्लॅशिंग दिव्यांमुळे पुन्हा व्हीआयपी संस्कृतीवरून वाद निर्माण झाला आहे. २०१७ मध्ये केंद्र सरकारने सरकारी वाहनांवरील लाल दिवे आणि अधिकार दर्शवणाऱ्या चिन्हांवर बंदी घातल्यानंतरही महापौरांच्या गाडीवर असे दिवे दिसल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.
माहितीनुसार, महापौर रितू तावडे यांच्या नव्या अधिकृत टोयोटा इनोव्हा गाडीच्या छतावर दिवे नसले तरी गाडीच्या समोरील भागात म्हणजे फ्रंट ग्रिल किंवा बंपरजवळ लाल आणि निळ्या रंगाचे फ्लॅशिंग दिवे बसवण्यात आलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या ताफ्यातील एका महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनावरही पोलिसांच्या वाहनांप्रमाणे लाल-निळे दिवे लावलेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा व्हीआयपी संस्कृती सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. नवनिर्वाचित महापौरांच्या गाडीबाबत नक्की काय सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळातही या विषयावर चर्चा वाढली आहे.
केंद्र सरकारने १ मे २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, अग्निशमन दल, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल आणि आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत लाल, निळे किंवा इतर रंगांचे फ्लॅशिंग दिवे वापरण्याची परवानगी आहे. सामान्य सरकारी वाहनांवर अशा प्रकारचे दिवे, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारे नामफलक लावणे नियमबाह्य मानले जाते. या निर्णयामुळे त्या काळात व्हीआयपी संस्कृती संपवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे मोठे कौतुक झाले होते. मुंबईतही महापौरांच्या गाडीवरील लाल दिवा काढण्यात आला होता.
मात्र आता मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर नव्या सत्ताधारी पक्षाने पुन्हा व्हीआयपी संस्कृती सुरू केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. महापौरांच्या गाडीवरील लाल-निळे दिवे आणि नामफलकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी एकूण १३ नवीन अधिकृत गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या परिवहन विभागामार्फत या गाड्या खरेदी करण्यात आल्या असून महापौरांसाठी अंदाजे ३० लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा गाडी देण्यात आली आहे. तसेच उपमहापौर आणि स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, बाजार समिती, महिला व बालकल्याण समिती, उद्यान समिती, विधी समिती आणि आरोग्य समितीच्या अध्यक्षांसाठी प्रत्येकी सुमारे १८ लाख रुपये किमतीच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्या देण्यात आल्या आहेत.
महापौरांच्या गाडीवरील दिव्यांमुळे पुन्हा व्हीआयपी संस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आला असून याबाबत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








