Political parties roll out ‘Mission 100%’ to boost voting : मतदानासाठी ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट; टॅब, लॅपटॉपसह डिजिटल वॉररूम सज्ज, कार्यकर्त्यांना ‘घरभेटी’चे आदेश
Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर आता प्रत्यक्ष रणसंग्राम मतदानाच्या दिवसावर येऊन ठेपला आहे. गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मतदारांनी फक्त घरात बसून राहू नये, तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे यासाठी पक्षांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले असून, बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे.
शहरातील प्रत्येक मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांनी आपापले स्टॉल आणि शामियाने बुधवारी रात्रीच उभे केले आहेत. केवळ कागदी चिठ्ठ्यांवर अवलंबून न राहता, यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात टॅब आणि लॅपटॉप दिसणार आहेत. मतदार यादीतील नाव अवघ्या काही सेकंदात शोधून मतदाराला त्याचा अनुक्रमांक आणि भाग क्रमांक देण्यासाठी ही हायटेक व्यवस्था करण्यात आली आहे. “एकही मतदार यादीतून सुटता कामा नये,” असा सज्जड दमच पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
अकोल्यातील अनेक प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी राजकीय पक्षांनी खासगी वाहनांची व्यवस्था केली आहे. घरापासून केंद्रापर्यंत आणि केंद्रापासून पुन्हा घरापर्यंत अशी ‘पिक अँड ड्रॉप’ सेवा पुरवली जाणार आहे. यासोबतच, केंद्राबाहेर लावलेल्या स्टॉल्सवर मतदारांसाठी चहा आणि नाश्त्याचीही सोय करण्यात आली आहे, जेणेकरून मतदानाचा उत्साह टिकून राहील.
Akola Municipal Corporation Election : अकोल्यात महिलांनी साड्या फाडून केली होळी
पक्षांच्या रणनीतीनुसार, गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत किती मतदान झाले, याची आकडेवारी बूथप्रमुख गोळा करणार आहेत. ज्या मतदारांनी तोपर्यंत मतदान केंद्रावर हजेरी लावली नाही, त्यांच्या घरी कार्यकर्ते प्रत्यक्ष जाऊन चौकशी करतील आणि त्यांना मतदानासाठी बाहेर काढतील. या ‘रिअल-टाइम’ ट्रॅकिंगमुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा पक्षांचा प्रयत्न आहे.
प्रभाग निहाय जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या असून, बूथप्रमुख आणि सहप्रमुखांना आपापल्या भागातील ‘व्होट बँक’ सुरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अकोल्याच्या गल्लीबोळात गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होणार आहे. ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून, पक्षांच्या संघटन कौशल्याची आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीची परीक्षा ठरणार आहे.








