Chief Minister interacted with Chandrapur residents through road show : रोड शो च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी साधला चंद्रपूरकरांशी संवाद
Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर दाखल झाले आहेत. भाजपमधील अंतर्गत वाद, उमेदवारीवरून झालेली घुसळण, थेट शिस्तभंगाची कारवाई आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा प्रचार दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आगमन झाले. डब्ल्यूसीएलचे मैदान, डीआरसीजवळील हेलिपॅडवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृतपणे जोरदार सुरुवात झाली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या निवडीपासून ते एबी फॉर्म वाटपापर्यंत रोजच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, आरोप-प्रत्यारोप आणि तणाव पाहायला मिळत होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार रॅली सुरू झाली आहे. महाकाली मंदिरात दर्शन घेऊन अंचलेश्वर मंदिर ते जटपुरा गेट असा सुमारे दीड तासांचा भव्य रोड शो त्यांनी आखला असून, याद्वारे भाजपची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या रोड शोपूर्वी आणि भाजप-शिवसेना महायुतीच्या समन्वयासंदर्भात शनिवारी चंद्रपुरात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे राज्य निवडणूक समन्वयक चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बैठकीला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर, पक्षनिरीक्षक चैनसुख संचेती, अशोक नेते, पालकमंत्री अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रचारात घ्यावयाची भूमिका, महायुतीतील समन्वय आणि मतभेद टाळण्यावर भर देण्यात आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व मतभेद विसरून ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
मात्र आजच्या प्रचार रॅलीत या शक्तीप्रदर्शनामागे भाजपमधील अंतर्गत संघर्षाची धग कायम आहे. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली उमेदवारांची यादी परस्पर बदलल्याचा आरोप चंद्रपूरचे निवडणूक निरीक्षक आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर झाला. या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटत थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, आमदार जोरगेवार यांचे कट्टर समर्थक असलेले चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही कारवाई करत कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीने जिल्हाध्यक्षांकडे पाठवण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीतून तब्बल १७ निष्ठावान कार्यकर्त्यांची नावे वगळण्यात आल्याने भाजपमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला होता. या बदलांमागे आर्थिक व्यवहार झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. सुनील डोंगरे, मनोज पोतराजे, माया उईके, विशाल निंबाळकर, बाळू कोतपल्लीवार आणि मुग्धा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी एबी फॉर्म न देता उमेदवारी विकल्याचा आरोप केला आहे. काही उमेदवारांशी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करत, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
Raj Thackeray : माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही !
या गंभीर आरोपांची दखल घेत भाजपने शिस्तभंगाची कारवाई करत शहराध्यक्षांना हटवले असून, हा आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आता पुढील कारवाई कोणावर होणार, पक्षनिरीक्षक चैनसुख संचेती आणि आमदार जोरगेवार यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई होणार का, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
या साऱ्या अस्थिर पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा चंद्रपूर दौरा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे रॅलीद्वारे पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे अंतर्गत नाराजी, आरोप आणि शिस्तभंगामुळे भाजपमधील वाद निवडणुकीत किती महाग पडतो, याकडे चंद्रपूरकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








