Prakash Ambedkar’s firm stance for so many seats : प्रकाश आंबेडकराची इतक्या जागांसाठी ठाम भूमिका !
Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण वेगाने बदलत असताना आता काँग्रेस पक्ष अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीसोबत न जाता स्वबळाचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसला अपेक्षित असलेली वंचित बहुजन आघाडीची साथही अनिश्चित ठरत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपावर 50-50 टक्के भूमिकेवर ठाम राहिल्याने काँग्रेस या निवडणुकीत एकटी पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना-मनसे आघाडी मजबूत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दुसरीकडे काँग्रेसने मात्र मुंबईत महाविकास आघाडीपासून वेगळी वाट धरत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मनसेला सोबत घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने वेगळा निर्णय घेतला असला, तरी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
Activists anger : आ. किशोर जोरगेवार, आपण ही मोठी चूक केली…! कार्यकर्त्यांचा संताप
मात्र या चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडत काँग्रेसचे टेन्शन वाढवले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 50 टक्के जागांवर दावा करत आम्ही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. राज्यभर आघाडीची डेडलाईन देता येणार नाही, तसेच मुंबईबाबतही अद्याप स्पष्टता नाही, असे त्यांनी नमूद केले. आघाडी जाहीर करण्याबाबत विचारणा केली असता ‘थांबा’ असे उत्तर दिले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, हे स्पष्ट असल्याने आता आम्हालाच कुणासोबत जायचे याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे विधान करत प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय चर्चांना आणखी वेग दिला आहे. मुंबईत काँग्रेससोबत अद्याप जागावाटपावर ठोस चर्चा सुरू झालेली नसल्याचे सांगत 50 टक्के जागा मिळाल्याशिवाय आघाडी होणार नाही, या भूमिकेवर वंचित ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेत आमचे अस्तित्व आणि ताकद आम्ही दाखवून दिली असून मुंबईत 200 जागांवर लढण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचाही दावा त्यांनी केला.
या संपूर्ण चर्चेला मिश्किल उपमा देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहापाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुलगी पसंत पडली तर लग्न लावू, अशी टिप्पणी करत त्यांनी आघाडीच्या अनिश्चिततेकडे सूचक इशारा दिला.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. रविवारी मुंबई काँग्रेसकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, सचिन सावंत आणि माजी मंत्री आमदार अस्लम शेख यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी सांगितले आहे.
Prashant Jagtap : अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राजीनामा
मुंबई काँग्रेसने वंचितसोबत आघाडी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली असून त्यात आमदार अमीन पटेल, माजी आमदार मधु चव्हाण आणि सचिन सावंत यांचा समावेश आहे. लवकरच पुन्हा चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच दोन-तीन दिवसांत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील समिती प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर सकारात्मक असल्याचे यु. बी. व्यंकटेश यांनी म्हटले असले, तरी जागावाटपाचा तिढा सुटतो की नाही, यावरच काँग्रेसची मुंबईतील रणनीती अवलंबून राहणार आहे.








