व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prashant Jagtap : अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राजीनामा

Prashant Jagtap : अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राजीनामा

Warning of resignation if Ajit Pawar and Sharad Pawar come together : प्रशांत जगताप असं का म्हणाले?, पुण्यातील समीकरण गुंतागुंतीचे

Pune पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आले तर ते केवळ शहराध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाहीत, तर पक्षाच्या सदस्यत्त्वाचाही त्याग करतील. त्यांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

भाजपला रोखण्यासाठी अजित पवार यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत एकत्र येण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशांत जगताप यांनी या चर्चेला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दोन राष्ट्रवादी गट एकत्र आले तर कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होईल आणि पक्षाला तोटा सहन करावा लागेल. त्यांनी आठवण करून दिली की, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर त्यांनी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटना पुन्हा उभी केली होती.

Local Body Elections : साहेब, उमेदवारी द्या, निवडून आल्याशिवाय राहणार नाही!

जगताप यांच्या या इशाऱ्यामुळे शरद पवार गटाच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जर त्यांनी अजित पवारांसोबत युती केली तर स्थानिक पातळीवर बंडखोरीची शक्यता वाढेल. दुसरीकडे, महाविकास आघाडी एकत्र लढली तर शरद पवार गटाला फायदा होईल, असे जगताप यांचे मत आहे. त्यामुळे पुढील काही तासांत या वादावर तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईत शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, राखी जाधव आणि शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय आजच ठाकरे यांना कळविण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. अजूनही दोन्ही गटांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू असून योग्य मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार गट व्यक्त करत आहे.

Local Body Elections : २१ वर्षांच्या मुलीने दिली अजित पवारांना मात

एकूणच, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता शरद पवार गट या संकटावर कसा तोडगा काढतो आणि जगताप यांचा पुढील राजकीय मार्ग काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!