Municipal election : ५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष, पण ..

The number of corporators is not even half, a different picture in local politics : नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही, स्थानिक राजकारणात वेगळेच चित्र

Mumbai: राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर आला असला, तरी प्रत्यक्ष सत्ताकारणात वेगळेच चित्र समोर आले आहे. राज्यातील ५० हून अधिक नगरपालिकांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, मात्र या बहुतांश ठिकाणी पक्षाकडे एकूण नगरसेवकांची संख्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे दोन ठिकाणी भाजपाला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, तरीही तिथे नगराध्यक्ष मात्र भाजपाचाच आहे.

या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेने काँग्रेससोबत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटासोबत स्थानिक पातळीवर हातमिळवणी केली. या पार्श्वभूमीवर भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी अनेक नगरपालिकांमध्ये संख्याबळाच्या दृष्टीने पक्ष कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

BMC Election 2026: राज–उद्धव ठाकरे यांची युती जाहीर होताच भाजप सतर्क

पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपालिकेत एकूण २० जागांपैकी भाजपाला एकही जागा मिळाली नाही. तरीही थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष भाजपाचा निवडून आला. वाडा नगरपंचायतीतही असाच प्रकार घडला. तिथे १७ पैकी एकही नगरसेवक भाजपाचा नाही, मात्र नगराध्यक्ष पद भाजपाकडे आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपालिकेत २५ पैकी केवळ ३ जागा भाजपाला मिळाल्या, पण येथेही नगराध्यक्ष भाजपाचाच आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपालिकेत २३ पैकी ४ जागा, शेंदुर्णीत १७ पैकी ८ जागा, नशिराबादमध्ये २० पैकी ४ जागा, सावड्यात २० पैकी ५ जागा आणि रावेरमध्ये २४ पैकी ९ जागांवर भाजपाचा विजय झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथे १७ पैकी फक्त ३ नगरसेवक भाजपाचे आहेत.

Municipal election : आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा अजेंडा*”

अमरावतीच्या अंजणगाव सुरजी नगरपालिकेत २८ पैकी ६, धरणी नगरपंचायतीत १७ पैकी ४ जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडून आले. नागपूरच्या कामठी नगरपालिकेत ३४ पैकी ८ आणि महुदा नगरपंचायतीत १७ पैकी ४ जागा भाजपाने जिंकल्या. मात्र या सर्व ठिकाणी नगराध्यक्षपद भाजपाकडेच आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेत ५९ पैकी १४ जागा, कुळगाव-बदलापूरमध्ये ४९ पैकी २२ जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडून आले. जालना जिल्ह्यातील परतूर नगरपालिकेत २३ पैकी ६, यवतमाळच्या पांढरकवडा नगरपालिकेत २२ पैकी ६, गोंदियाच्या तिरोडा नगरपालिकेत २० पैकी ६ जागांवर भाजपाचा विजय झाला. अकोल्याच्या अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ११, नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे २५ पैकी ८, लातूरच्या उदगीरमध्ये ४० पैकी १३, पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे २८ पैकी १० जागा भाजपाने जिंकल्या आहेत.

Municipal Council : पहिल्याच सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित

याशिवाय राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये भाजपाची स्थिती ही ‘नगराध्यक्ष आमचा, पण बहुमत नाही’ अशीच आहे. जळगावातील फजिरापूर, नागपूरच्या गोधनी रेल्वे, रत्नागिरीच्या गुहागर, सांगलीच्या आटपाडी, जत, बुलढाण्याच्या जळगाव जामोद, नांदुरा, चिखली, सातारच्या वाई, फलटण, रहिमतपूर, वाशिम, मुर्तिजापूर, वैजापूर, साकोली, खापा, भिवापूर, कोपरगाव, भिशी, चंदगड आदी ठिकाणी भाजपाला लक्षणीय यश मिळाले असले तरी बहुतांश ठिकाणी नगरसेवकांची संख्या निम्म्यापेक्षा कमीच आहे.

त्यामुळे ५० हून अधिक नगरपालिकांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष असले, तरी प्रत्यक्ष संख्याबळाच्या राजकारणात पक्षाला मर्यादा स्पष्टपणे जाणवत आहेत. या परिस्थितीची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणूनही निवडून आली असेल, तर तिची दोन्ही पदे कायम राहणार आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशा व्यक्तीला नगराध्यक्ष किंवा नगरसेवक या दोन्ही भूमिकांमध्ये मतदानाचा अधिकार राहणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
__