Municipal elections : बावनकुळे मंचावर असतानाच भाजपाच्या अन्यायग्रस्तांचा आक्रोश उफाळला !

BJP workers who suffered injustice broke during campaign in Chandrapur : चंद्रपुरात प्रचाराच्या वेळी भाजपमधील ‘त्या’ कार्यकर्त्यांचा बांध फुटला

Chandrapur : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील असंतोष चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा सुरू असतानाच भाजपाच्या अन्यायग्रस्तांचा आक्रोश उफाळला,अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांचा बांध फुटला राकेश बोमनवार यांनी थेट मंचावर धडक दिल्याने सभास्थळी एकच खळबळ उडाली. मंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणत बंडखोराने संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित कार्यकर्ते आणि नेते अवाक झाले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किशोर जोरगेवार यांनी प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेली उमेदवारांची यादी बदलल्याचा प्रकार चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजचा हा प्रकार घडल्याने भाजपमधील बंडखोरी, असंतोष आणि अंतर्गत राजकारण उघड झाले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीतच मंत्र्यांच्या सभेत बंडखोरांची थेट धडक बसल्याने चंद्रपूरचे राजकारण अधिकच तापले असून, याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Municipal elections: राजकारण तापले, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला!

चंद्रपूर शहरातील जटपूरा गेट प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. छबू वैरागडे, रवी लोणकर, क्षीरसागर यांच्यासह इतर उमेदवारांच्या समर्थनार्थ बावनकुळे भाषण करत असतानाच, याच प्रभागातून भाजपची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राकेश बोमनवार अचानक मंचावर आले. मंचावर पोहोचताच त्यांनी थेट बावनकुळे यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरला.

मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असताना आमदार किशोर जोरगेवार यांनी हस्तक्षेप करत बोमनवार यांना मंचावरच रोखले आणि हात पकडून खाली उतरवले. यावेळी बावनकुळे काही क्षण गडबडलेले दिसले. भाषण सुरू असतानाच “आता बोलायचं आहे” असा इशारा देत बंडखोर उमेदवाराने मंचावर उभे राहिल्याने सभास्थळी तणाव निर्माण झाला. बावनकुळे यांनीही त्याला खाली उतरून भाषणानंतर बोलू, असे सांगत प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बोमनवार यांना सभास्थळापासून दूर नेले.

Municipal elections : मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव

या घटनेमुळे संपूर्ण सभास्थळी खळबळ उडाली. भाजपच्या बंडखोर उमेदवाराने सर्वांसमक्ष मंत्र्यांच्या मंचावर धडक देण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, याच बंडखोर उमेदवाराने याआधी उमेदवारी न मिळाल्याने स्थानिक एन.डी. हॉटेलमध्ये पक्ष निरीक्षकांसमोर गोंधळ घातला होता आणि एका माजी नगरसेविकेवर शिवीगाळ केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. उमेदवारी कापल्याचा राग थेट प्रचार सभेत व्यक्त झाल्याने भाजपमधील नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.

Ajit Pawar: भाजपशी जमेना, भाजपवाचून करमेना; अजित पवारांची राजकीय कोंडी

दरम्यान, या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही बावनकुळे यांच्यावर टीकेची संधी साधली आहे. बंडखोरांचा संताप इथेच थांबला नाही. सायंकाळी इंदिरानगर येथे झालेल्या दुसऱ्या सभेतही बंडखोर कार्यकर्त्यांनी “एबी फार्म चोर आहे”, “२०० युनिट चोर आहे” अशा घोषणा देत गोंधळ घातला. एकीकडे मंत्र्यांचे भाषण सुरू असताना दुसरीकडे घोषणाबाजी सुरू झाल्याने सभास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली. या घोषणांमुळे बावनकुळे यांना सभास्थळी येताना आणि परत जाताना वाहनाचा मार्गही बदलावा लागला. हा सगळा प्रकार सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

___