Municipal Elections : कुठे कोट्यवधींची रोकड तर कुठे राडे, रात्रभर कोंबिंग ऑपरेशन

Maharashtra shaken ahead of municipal elections : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र हादरला

Mumbai: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक असताना संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. प्रचार संपल्यानंतर छुप्या पद्धतीने मतदारांना प्रभावित करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिस आणि निवडणूक यंत्रणांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान जळगाव, डोंबिवली, वसई-विरार आणि मुंबईत घडलेल्या घटनांनी निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

डोंबिवलीत परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक २९ मध्ये युतीतील मित्र पक्षांमध्येच उघड संघर्ष उफाळून आला. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीला पैसे वाटपाच्या आरोपांनी हिंसक वळण दिले. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने येताच तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून प्रकरण थेट हत्येच्या प्रयत्नापर्यंत पोहोचले आहे.

Mehkar Municipal Council : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचीच निवड, सत्तासमीकरण बदलले

भाजप उमेदवाराच्या पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेनेच्या दोन उमेदवारांसह पाच जणांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले. उपचार घेत असलेले उमेदवार ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, परिस्थिती चिघळू नये म्हणून डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुसरीकडे जळगावमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने मोठी धडक कारवाई करत एका कारमधून तब्बल २९ लाख रुपयांची रोकड, मोठ्या प्रमाणात चांदी आणि सोन्याचा साठा जप्त केला. कोणतीही वैध कागदपत्रे न सादर केल्यामुळे हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला. मतदानाच्या अगदी तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Deulgao Raja Municipal Council : देऊळगाव राजा नगर परिषदेत महायुतीची सत्ता भक्कम; उपाध्यक्षपदी वनिता भुतडा विजयी

वसई-विरार भागातही मध्यरात्री प्रचंड गदारोळ झाला. वसई पूर्वेतील काही भागांत विविध पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप करत रस्त्यावर उतरले. पिशव्यांसह कार्यकर्त्यांना पकडल्याचे दावे करण्यात आले, व्हिडिओ व्हायरल झाले, पोलिसांशीही हुज्जत झाली. मात्र पोलिसांनी रोख रक्कम सापडली नसल्याचे स्पष्ट करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुंबईतील बोरीवलीतही राजकीय संघर्ष उफाळून आला. पैसे वाटपाच्या आरोपांवरून कार्यकर्ते आमनेसामने आले आणि रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती आवरण्यात यश मिळवले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

मतदानाच्या पूर्वसंध्येला राज्यभर घडलेल्या या घटनांमुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पैसा, सत्ता आणि हिंसेच्या आरोपांनी भरलेल्या या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोरचे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.

___