Riteish Deshmukh’s blunt reply to BJP leader’s statement : भाजप नेत्याच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची सडेतोड उत्तर
Latur : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वक्तव्य केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अडचणीत आले आहेत. त्यांच्या या विधानावर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी संयमित पण खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले असून लातूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या सभेत भाषण करताना, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात शंका नाही,” असे विधान केले. या वक्तव्यानंतर लातूरमध्ये राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावर रितेश देशमुख यांनी मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. “दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र,” असे म्हणत रितेश देशमुख यांनी थेट पण संयमित शब्दांत आपली भूमिका मांडली. रितेश यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे.
Municipal elections: भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक बिनविरोध निवडून येत आहेत !
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही. अनेक जण अशा इच्छा बाळगून आले, पण स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना नेहमीच त्यांची जागा दाखवली. विलासराव देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. सत्तेचा माज असलेले भाजप नेते आज लातूरमध्ये येऊन बरळून जात आहेत. विलासराव देशमुख आणि लातूरकरांचं नातं त्यांना कधीच कळणार नाही. भाजपवाल्यांनी हे लक्षात ठेवावं, याचा करारा जवाब मिळेल,” असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी रितेश देशमुख यांच्या प्रतिक्रियांवर सावरा सावर करताना जर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.








