Ganesh Naik statement creates stir in Navi Mumbai politics: गणेश नाईकांच्या वक्तव्याने नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ
Navi Mumbai : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष पुन्हा उघडपणे समोर आला असून भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत नाईकांनी, पक्षाने परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा पलटीच नाही तर त्यांचे घोडेही बेपत्ता करू, असा खळबळजनक इशारा दिला आहे.
ठाणे आणि नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आधीपासूनच तणावाचे वातावरण आहे. नवी मुंबईत हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत असून महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर गणेश नाईक चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी त्याला जाहीरपणे प्रत्युत्तर दिले आहे.
Municipal Election: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद !
गणेश नाईक म्हणाले की, मी हुकूमशहा असतो तर जनतेने मला 25 वर्षे निवडून दिले नसते. तुम्ही उन्माद करणार असाल तर तो मोडण्याची ताकद माझ्याकडे आहे. मला हलक्यात घेऊ नका, असा दम भरतानाच त्यांनी शिंदेंच्या राजकारणावर थेट घणाघात केला. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तीन वेळा मी पालकमंत्री असताना मला याबाबत विश्वासात घेतले गेले नाही. तुमच्या आधी गणेश नाईक पालकमंत्री होते, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.
नाईकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप करत स्पेशल ऑडिटची मागणी केली. महापालिकेची तीन हजार कोटी रुपयांची एफडी 800 कोटींवर कशी आली, यासाठी जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सिडकोचा प्रशासक कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत होता, शहराच्या विकासासाठी राखीव ठेवलेले भूखंड सिडकोने विकले का, त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले.
Municipal Election : ‘एआयएमआयएम’ला डावलून भाजपची नवी सत्ताआघाडी !
शहराचा विकास महत्त्वाचा की यांचा हरामाचा पैसा मोठा, असा संतप्त सवाल करत गणेश नाईकांनी ईडीकडून नवी मुंबई महापालिकेचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कलगीतुरा अधिकच रंगला असून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत शिंदेंचे वर्चस्व वाढू नये यासाठी गणेश नाईकांनी थेट दंड थोपटल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळत आहेत.








