Results of all elections declared same day, December 21 : सर्व निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला एकाच दिवशी जाहीर करावे लागणार
Nagpur : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय देत मतमोजणीची प्रक्रिया थेट बदलून टाकली आहे. यापूर्वी आज पार पडलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या मतमोजणी होणार होती, मात्र न्यायालयाने ही मतमोजणी रद्द करत सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल एकाच दिवशी 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करावेत, असा आदेश दिला आहे. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने त्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या 20 नगरपरिषदांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने आणि निकाल आधी जाहीर झाल्यास मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला होता. सगळ्या युक्तिवादानंतर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले की सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल एकाच दिवशी 21 डिसेंबरला घोषित केले जावेत. आज झालेल्या मतदानाचे निकालही त्याच दिवशी घोषित केले जातील. तसेच एक्झिट पोलही 20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानंतरच प्रसारित करता येतील, असा नियम लागू ठेवण्यात आला आहे. या कालावधीत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची आदर्श आचारसंहिताही लागू राहील.
Pankaja Munde : आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा… आम्ही गंभीर नेते !
निवडणूक पुढे ढकललेल्या ठिकाणांतील उमेदवारांना दिलेली निवडणूक चिन्हे कायम राहतील, मात्र निवडणूक रद्द किंवा पुढे ढकलल्यामुळे झालेला अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी उमेदवारांची खर्चमर्यादा वाढवण्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे. हा निर्णय दिल्यानंतर निवडणूक व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना राज्यातील निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच मतमोजणी पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाचा निर्णय स्वीकारत निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. “आयोगावर नाही, पण प्रक्रियेवर माझी आक्षेपार्ह नाराजी आहे. मतमोजणी पुढे ढकलणे योग्य नाही. घोषीत झालेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात आणि आता निकालही पुढे गेला हे यंत्रणेचे अपयश आहे,” असे ते म्हणाले.
या आदेशामुळे प्रशासन आणि पोलिसांवर ताण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जवळपास 280 मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागणार आहेत. ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल, दररोज निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी स्ट्रॉंग रूमची पाहणी करून स्वाक्षरी करणे बंधनकारक असेल. विधानसभेच्या 288 मतमोजणी केंद्रांच्या तुलनेत जवळपास तितक्याच प्रमाणात नगरपरिषद मतमोजणी ठेवावी लागणार असली तरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मतदानानंतर लगेच होते, तर नगरपरिषदमध्ये तब्बल तीन आठवडे स्ट्रॉंग रूम सांभाळण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
Eknath Shinde Cash Bag : एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात ‘पैशांच्या बॅगा’ प्प्रकरणाने खळबळ
21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांमुळे राजकीय समीकरणात कोणते चित्र उभे राहते आणि कोणत्या पक्षांचा किल्ला मजबूत होतो हे पाहण्यासाठी राज्याचे लक्ष आता मतमोजणीच्या दिवशी खिळले आहे.








