व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अनिल सोलेंचे थेट भाजपला आव्हान; बंड कायम, नागपूर पदवीधरचा निकाल बदलणार?

अनिल सोलेंचे थेट भाजपला आव्हान; बंड कायम, नागपूर पदवीधरचा निकाल बदलणार?

गडकरी, फडणवीसांचेही ऐकले नाही; भाजपच्या मंडळींचाही खुला पाठिंबा

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपचे प्रयत्न फोल ठरले आहेत. माजी आमदार सोले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवून थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. आता भाजपला काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्यासोबतच सोले यांचाही सामना करावा लागणार आहे. हे बघता या निवडणुकीत पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची शक्यता निर्माण झाली आहे.

अनिल सोले यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न तीन दिवसांपासून सुरू होते. मात्र त्यांनी कोणालाच प्रतिसाद दिला नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्या घरी येऊन गेले. मात्र ते त्यांना भेटले नाही.

उमेदवारी मागे घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे प्रेशर येणार याची कल्पना असल्याने सोले यांनी तीन दिवसांपासून आपला मोबाईल बंद करून ठेवला होते. ते कोणाच्याच संपर्कात नव्हते. दुसरीकडे सोशल मीडियावरून त्यांच्या समर्थकांचा धडाक्यात प्रचार सुरू होता. आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काहीतर तोडगा निघेल, सोले माघार घेण्यास राजी होतील अशी अपेक्षा उमेदवार कोहळे व भाजपच्या कार्यकर्त्यांना होती. सर्वांचे लक्ष दुपारच्या तीन वाजताकडे लागले होते. माघारीची वेळ निघून गेल्यावर भाजपला मोठा धक्का बसला. फक्त स्वयंसेवक रमण सेनाड यांच्या माघारीचा थोडाफार दिलासा भाजपला मिळला आहे. मात्र ते कोहळे यांना सहकार्य करतीलच याची शाश्वती नाही. रमण सेनाड यांच्यासह एकूण १६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता एकूण ३८ रिंगणात कायम आहेत.

अनिल सोले नियंत्रणाबाहेर; बंडखोरीवर ठाम असल्याने बावनकुळे हतबल

तत्पूर्वी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली हतबलता व्यक्त करताना पक्षातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी करू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले. अनिल सोले अर्ज भरणार नाहीत असे वाटले होते, पण त्यांनी अर्ज दाखल केला. पक्ष हा आईसारखा असतो.

राजकारणात कधी संधी मिळते तर कधी थांबावे लागते. २०१९ मध्ये मलाही पक्षाने थांबवले होते, मात्र २०२४ मध्ये पुन्हा संधी दिली. सोले हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेऊ नये, अशी विनंती बावनकुळे यांनी केली होती.

 

error: Content is protected !!