The BJP sent its own man into the Shiv Sena and got him elected : भाजपने आपला माणूस शिवसेनेत पाठवून निवडून आणला
Nagpur भाजपसोबत फक्त आठ जागेवर युती केल्याने शिंदे सेनेत मोठा असंतोष उफाळून आला होता. एवढचे नव्हे तर सहा जागेवर भाजपने आपले उमेदवार लादले होते. त्यामुळे शिवसैनिकांनी युती कशाला केली असा सवाल नेत्यांना केला होता. अर्थराज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी फक्त आपल्या एकमेव समर्थकासाठी युती केल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला होता. मात्र ज्या उमेदवारासाठी जयस्वालांनी तडजोड केल्याचा आरोप आहे त्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला आहे. धनुष्यबाणाला कमळाची साथ लाभल्यानंतरही कोमल तळवेकर यांच्या पदरात विजय पडला नाही. धनुष्यबाणावर लढलेले भाजपचे गणेश चर्लेवार यांनी शिंदे सेनेला अधिकृत खाते उघडून पक्षाची लाज राखली.
प्रभाग क्रमांक तीनमधून कोमल तळवेकर या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार होत्या. माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांच्या त्या कन्या आहेत. तळवेकर आशिष जयस्वाल यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवसेनेच्यावतीने युतीमध्ये २० जागेची मागणी केली होती. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपासोबत जागा वाटपासाठी बोलणी सुरू होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या घरी झालेल्या बैठकीत शेवटी ८ जागा शिवसेनेसाठी सोडण्याचा निर्णय झाला.
त्यापैकी ६ जागेवर भाजपचे उमेदवार राहतील असेही शिवसेनेला सांगण्यात आले होते. या युतीवर शिवसेनेचा एकही नेता समाधानी नव्हता. त्यापेक्षा स्वतंत्र लढणे योग्य राहील असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र भाजपने कोणाचेच ऐकले नाही. शेवटी शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने, पूर्व व विदर्भाचे संघटक किरण पांडव हे बैठक सोडून निघून गेले. त्यामुळे युती तुटल्याची अफवा पसरली होती. मात्र अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बैठक सोडली नाही.
Nagpur municipal corporation election : माजी आमदार महापालिकेची निवडणूक हरले
त्यांनी भाजपच्या सर्व अटी मान्य केला. दोन जागेवर शिवसेनेचे तर उर्वरित सहा जागेवर भाजपचे उमेदवार धनुष्यबाणावर लढतील असेही त्यांनी मान्य केले. या युतीवरून शिवसैनिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपचे शिवसेनेसाठी प्रभाग क्रमांक ८ मध्ये कृतिका गोन्नाडे, प्रभाग २४ मधील दुरेश्वरी कोसारे, प्रभाग पाचमध्ये योगेश गोन्नाडे, प्रभाग क्रमांक ३१ गणेश चर्लेवार, प्रभाग ३०मध्ये स्नेहल बिहारे, प्रभाग ९मध्ये प्रतिभा चवरे आणि प्रभाग क्रमांक ७ मध्ये मीना तरारे यांना उमेदवारी देण्यात आली होती.








